इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
Israel: इस्त्रायलनं लेबनॉनवर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये 89 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणनं यानंतर आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला इशारा दिला आहे.

बैरुत : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर इस्त्रायलनं मात्र आक्रमक भूमिका कायम ठेवली. इस्त्रायलनं लेबनॉनवर जोरदार हल्ले केले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं 89 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर, 700 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांच्या मते देशातील रुग्णालयांमध्ये जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. इस्त्रायलनं लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेकडून एक स्पष्टीकरण समोर आलं आहे. व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी एक्सियोस शी बातचीत केली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीचा आणि लेबनॉनचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेनं म्हटलं की लेबनॉनमध्ये सुरु असलेली लष्करी कारवाई त्यांच्या इराण सोबतच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. दुसीरकडे इराणनं या हल्ल्यांबाबत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
इराणची वृत्तसंस्था तस्नीमनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार लेबनॉनवरील इस्त्रायलवरील हल्ले थांबवले नाहीत तर ते शस्त्रसंधीतून बाहेर पडतील. इराणच्या धमकीमुळं युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
इस्त्रायलनं लेबनॉनवर हल्ले सुरु ठेवल्यानं इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिपिंग सूत्रांनुसार होर्मुझची सामुद्रधुनी पार करणाऱ्या जहाज मालकांना इशारा देण्यात आला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्यासाठी इराणची परवानगी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. जी जहाजं परवानगी देणार नाहीत ती उडवून देऊ असा इशारा इराणनं दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेनं इराणला जे देश शस्त्र पुरवठा करतील त्यांच्यावर 50 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी 40 दिवसांच्या संघर्षानंतर झालेली आहे. आता ही शस्त्रसंधी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये चर्चा होणार आहे. शस्तसंधी झाल्यानंतर काही ठिकाणी हल्ले झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं आता आखाती देशांमधील युद्ध थांबवणार का युद्ध आणखी चिघळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






















