Benjamin Netanyahu to be Next PM of Israel : इस्रायलमध्ये ( Israel ) पुन्हा एकदा बेंजामिन नेतान्याहू ( Benjamin Netanyahu ) यांच्या बाजूने जनतेनं निकाल दिला आहे. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू पुन्हा एकदा इस्त्राइलचे पंतप्रधान ( PM of Israel ) होणार आहेत. नेतान्याहू विक्रमी सहाव्यांदा इस्त्राइलच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील. इस्त्राइलचे राष्ट्रपती ( President of Israel ) आइजॅक हर्जोग ( Isaac Herzog ) यांनी बेंजामिन नेतान्याहू यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. 1 नोव्हेंबरला निवडणुकीच्या निकालानंतर, ( Israel Election Result 2022 ) राष्ट्रपतींनी पुढील सरकार स्थापन करण्यासाठी बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडे रविवारी जनादेश सुपूर्द केला आहे.
नेतान्याहू यांना राष्ट्रपतींकडून सरकार स्थापनेसाठी आमंत्रण
राष्ट्रपती कार्यालयाकडून एका निवेदनात म्हटलं आहे की, इस्रायलची संसद नेसेदच्या 64 सदस्यांचा पाठिंबा मिळविणारे नेतान्याहू यांच्याकडे पुढील सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरच्या निवडणुकीत 25 व्या नेसेटसाठी निवडून आलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रपतींनी नेतान्याहू यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
'हे सरकार स्थिर आणि यशस्वी सरकार असेल'
बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विट करत लिहिलं की, 'निवडणूकीच्या निकालानंतर जनतेने स्पष्टपणे माझ्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. माझी शिफारस करणाऱ्या नेसेटच्या सर्व 64 सदस्यांचे मी आभार मानतो. हे सरकार स्थिर आणि यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करु. हे एक जबाबदार आणि जनतेला समर्पित सरकार असेल. जे फक्त जनतेच्या हितासाठी काम करेल.'
गेल्या चार वर्षांपासून इस्त्राइलमध्ये राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. 2019 नंतर आतापर्यंत येथे पाच वेळा निवडणुकाही झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा बेंजामिन नेतान्याहू सहाव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होणार आहेत.
सरकार स्थापनेसाठी नेतन्याहू यांच्याकडे 28 दिवसांचा कालावधी
इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी शुक्रवारी (11 नोव्हेंबर) संसदेच्या सर्व गटांशी बैठक घेतती. त्यानंतर त्यांनी नेतन्याहू यांच्या सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याची घोषणा केली. राष्ट्रपती हर्झोग यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना जनादेश सुपूर्द केला आहे. नेतन्याहू यांच्याकडे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी 28 दिवस आहेत. मात्र, इस्रायलच्या कायद्यानुसार गरज भासल्यास 14 दिवसांनी वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे.