मुंबई : इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन (Palestine) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने (Air India) इस्राइलला जाणारी आपली उड्डाणं रद्द केली आहेत. आमचे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही एअर इंडियाची इस्राइलला जाणारी उड्डाणं ही 14 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या कालावधीमध्ये ज्या लोकांनी बुकिंग केले होते, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचं आश्वासन एअर इंडियाकडून देण्यात आलं आहे.
एअर इंडियाकडून दर आठवड्याला इस्राइलमधील तेल अवीवच्या दिशेने पाच उड्डाणं करण्यात येतात. याआधी शनिवार (7 ऑक्टोबर) रोजीचे फ्लाईट क्रमांक AI 139 आणि परतीचे फ्लाईट AI 140 जे नवी दिल्ली ते तेल अवीव उड्डाण करणार होते, ते देखील रद्द करण्यात आले.
हमासने इस्रायलवर केला हल्ला
शनिवारी (7 ऑक्टोबर) रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हापासून पॅलेस्टाईन आणि इस्राइल या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पेटली. आतापर्यंत इस्रायलमध्ये सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1590 लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्ये 232 लोकांचा मृत्यू झाला आणि 1790 लोक जखमी झालेत. गाझामध्ये असलेल्या पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 256 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात 20 मुलांचा समावेश आहे. तर यामध्ये आतापर्यंत 1788 पॅलेस्टिनीही जखमी झाले आहेत.
इस्रायलने दिले प्रत्युत्तर
दरम्यान हमासने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईन विरोधात युद्ध घोषित केले. तर शत्रूला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल असं देखील त्यांनी म्हटलं. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हमासने गाझा पट्टीतून 2 हजारांहून अधिक क्षेपणास्र डागली. तर याचे प्रत्युत्तर देण्यासाठी इस्राइलच्या लष्कराने गाझा शहराच्या मध्यभागी असलेला एक टॉवर पाडला. हवाई आणि सागरी सीमेवर 7 पेक्षा जास्त ठिकाणी हमासने घुसखोरी केल्याची माहिती इस्राइलच्या लष्कराने दिली आहेत.
इस्रायलच्या लष्कराने सांगितले की आम्हाला गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवायचे आहे, गाझा पट्टीवर नियंत्रण मिळावणं हे आमचं मुख्य उद्देश आहे. इस्रायलचे लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच यांनी यांसंबधी बोलताना म्हटलं की, पुढील 12 तासांत आम्हाला संपूर्ण क्षेत्रावर नियंत्रण मिळवायचं आहे.