Israel Gaza Attack: इस्रायल (Israel) आणि हमासमधील (Hamas) युद्धाचा आज आठवा दिवस... इस्रायलकडून गाझा (Gaza) पट्टीवर सतत बॉम्बहल्ले सुरू आहेत. हमासनं इस्रायलला आज मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हमासनं इस्रायलविरोधात कुठला मोठा प्लॅन आखलाय, याबाबत अवघ्या देशाची धडधड वाढली आहे. काल दिवसभरात झालेल्या बॉम्बहल्ल्यात गाझा पट्टीत 150 हून अधिक मृत्यू झाले आहेत, तर मृतांचा एकूण आकडा चौदाशेच्या पार गेला आहे. गाझा पट्टीतले अनेक भाग पूर्णपणे बेचिराख झाले आहेत. तिकडे इस्रायलमध्येही 1 हजार 300 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्यांनी गाझामध्ये ऑपरेशन सुरू केलं आहे. हमासच्या एकएका अतिरेक्यांला शोधून ठार केलं जात आहे.  इस्रायलनं अन्न, वीज आणि पाण्याचा पुरवठा बंद केल्यानं गाझा पट्टीतले 20 लाख रहिवाशी जेरीस आले आहेत. हमासनं अपहरण करून गाझा पट्टीत नेलेल्या इस्रायली नागरिकांना सोडेपर्यंत अन्न, पाणी आणि विजेचा पुरवठा सुरू करणार नाही, अशी अट इस्रायलनं घातली आहे. 


अल जजिराच्या वृत्तानुसार, इस्रायलचे ऊर्जामंत्री म्हणाले की, "आमच्या ज्या नागरिकांना बंधक बनवलंय, त्यांची सुटका होईपर्यंत वीज पुरवठा सुरू करणार नाही. पाण्याचे हायड्रंट उघडले जाणार नाहीत तसेच, इंधन ट्रकही चालू केले जाणार नाहीत." दरम्यान, इस्रायलनं शनिवारपासून गाझाला वीजेसह अन्न, औषध आणि पाणी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद केला आहे. 


गाझा पट्टी अंधारात, अन्न पाण्यावाचून नागरीकांचे हाल 


गाझा येथील एकमेव वीजनिर्मिती केंद्र बंद पडल्यानं बुधवारी गाझा पट्टी अंधारात बुडाली होती. त्यामुळे गाझा येथील मुख्य रुग्णालयातील जनरेटरमध्ये काही तासंच इंधन शिल्लक होतं. अशा परिस्थितीत गाझातील स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. गाझा पट्टीला पाणी आणि वीजपुरवठा होत नसल्याबद्दल आंतरराष्ट्रीय अधिकार समुहांनी चिंता व्यक्त केली आहे.


इराण म्हणतंय... 


दुसरीकडे, इस्रायलकडून गाझावर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांवर इराणनं प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी इस्रायलवर 'नरसंहार' केल्याचा आरोप केला आहे. तसेच, गाझाला घेराव हे सर्व आंतरराष्ट्रीय करारांचं उल्लंघन असल्याचंही इस्रायलनं म्हटलं आहे.  


पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये 1,200 हून अधिक लोक मरण पावले आहेत. या हल्ल्यात 5339 लोक जखमी झाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या शनिवारी हमासनं इस्रायलच्या अनेक शहरांवर अचानक रॉकेटचा वर्षाव केला, ज्यामध्ये किमान 1,200 लोक मारले गेल्याचं वृत्त आहे.