Iran War LIve Update: येत्या पाच दिवसात म्हणजेच 21 एप्रिल रोजी युद्धविराम संपण्यापूर्वी अमेरिका आणि इराण एका कराराच्या जवळ पोहोचले आहेत. अमेरिकन माध्यमांनुसार, दोन्ही बाजूंमधील चर्चा पुढे सरकली आहे, तरीही काही मतभेद कायम आहेत. दरम्यान, तेहरानमध्ये इराणी अधिकारी आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अमेरिकेचा संदेश घेऊन मुनीर आधीच इराणमध्ये दाखल झाले असून त्यांनी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली आहे. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की मध्यस्थ म्हणून काम करत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्यासोबत चर्चा करत आहेत आणि मसुदा प्रस्ताव सादर करत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, करार घडवून आणण्यासाठी युद्धविराम वाढवला जाऊ शकतो, जरी अमेरिकेने अद्याप औपचारिकपणे सहमती दर्शवलेली नाही.
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणवरील दबाव वाढला
अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ट्रम्प यांची नौदल नाकेबंदी आणि आर्थिक दबावामुळे इराणवर करार करण्यासाठी दबाव वाढत आहे. अमेरिकेने दावा केला आहे की, नाकेबंदी सुरू झाल्यापासून गेल्या 48 तासांत एकही जहाज इराणी बंदरांवर पोहोचलेले नाही. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) नुसार, या काळात नऊ जहाजांना परत पाठवण्यात आले. इराण दररोज अंदाजे 15 लाख बॅरल तेलाची निर्यात करतो, ज्यामुळे त्याला अंदाजे 140 दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळतो, परंतु या नाकेबंदीमुळे या महसुलावर परिणाम होऊ शकतो. इराणची जवळपास 90 टक्के तेल निर्यात खार्ग बेटावरून होते, ज्यावर या नाकेबंदीचा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, जर इराण तेल निर्यात करू शकला नाही, तर उत्पादन थांबवण्यास भाग पडू शकते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होईल. युद्धापूर्वीच निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था दबावाखाली होती, पण आता परिस्थिती आणखी बिघडली आहे.
इराणच्या अणुकार्यक्रमावरील चर्चेत प्रगती
इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भात अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेत प्रगती झाली आहे. अहवालानुसार, अलीकडील राजनैतिक प्रयत्नांनंतर दोन्ही बाजू कराराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांचा तेहरान दौराही याच मालिकेचा एक भाग आहे, जिथे ते अमेरिकेकडून एक संदेश घेऊन आले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात गुप्त संपर्क सुरू असून, मसुदा प्रस्तावांवर काम सुरू आहे. अहवालानुसार, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या आण्विक क्षमतेवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे वाटाघाटींना गती मिळाली आहे. तथापि, कराराच्या दिशेने प्रगती होत असूनही, दोन्ही बाजूंमध्ये मतभेद कायम आहेत आणि काही पक्ष त्याला विरोध करत आहेत.
गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
- अमेरिकेने दावा केला आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीनंतरच्या 48 तासांत एकही जहाज इराणच्या बंदरात आले नाही, तर नऊ जहाजांना परत पाठवण्यात आले.
- इराणने इशारा दिला आहे की, जर अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहिली, तर ते लाल समुद्र, ओमानचा समुद्र आणि पर्शियन आखातातील सागरी व्यापार थांबवतील.
- लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमधील मृतांचा आकडा 2167 वर पोहोचला असून,7 हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
- अमेरिका आणि इराण यांच्यातील आण्विक चर्चेत प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. 21 एप्रिलपूर्वी करार घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असून, एक पाकिस्तानी शिष्टमंडळ तेहरानमध्ये दाखल झाले आहे.
- इस्रायलने 24 तासांत दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या 200 हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
