Iran War Live Update: जागतिक व्यापाराची जीवनवाहिनी मानली जाणारी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) सध्या जगातील सर्वात धोकादायक ठिकाण बनली आहे. या सागरी मार्गावर इराणने आपले नियंत्रण घट्ट केले असून, अमेरिकेच्या वाढत्या लष्करी लष्करी हालचालींमुळे येथे कधीही मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने अधिकृतपणे हा मार्ग पूर्णपणे बंद केला नसला तरी, त्यांनी एक 'नवी चाल' खेळली आहे. इराण केवळ त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या आणि मित्रराष्ट्रांच्या जहाजांनाच या मार्गातून जाण्याची परवानगी देत आहे. दुसरीकडे, अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावरील तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने सौदीतील अमेरिकन तळावर 5 टँकर विमाने निकामी केली आहेत. या तणावामुळे होर्मुझमधून होणारी सर्वसामान्य वाहतूक ठप्प झाली असून जगाचा श्वास रोखला गेला आहे.
इराणची मोठी खेळी; 'युआन'मध्ये व्यवहाराची नवी अट!
'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार इराणने म्हटले आहे की, जर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून तुमची तेलाची जहाजे सुरक्षितपणे नेऊ द्यायची असतील, तर त्या तेलाचा व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये न करता चीनच्या 'युआन' (Yuan) या चलनात करावा लागेल.जगभरात तेलाचा व्यापार प्रामुख्याने अमेरिकन डॉलरमध्ये होतो. इराण आता डॉलरचे महत्त्व कमी करून चीनच्या चलनावाढ देण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इराण आणि चीनचे संबंध जवळचे आहेत. चीनच्या चलनावर व्यापार केल्यास इराणवर असलेल्या अमेरिकन निर्बंधांचा परिणाम कमी होईल, असाही यामागे अंदाज असू शकतो. तथापि, इराण सर्वांनाच रस्ता मोकळा करून देणार नाही, तर जे देश ही अट मान्य करतील, अशाच मर्यादित जहाजांना तिथून जाता येईल.
भारतासाठी दिलासा मिळाला?
दरम्यान, संपूर्ण जग ऊर्जा संकटाने 'गॅस'वर आलं असतानाच भारताने आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर मोठा विजय मिळवल्याचे बोलले जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणसोबत केलेल्या यशस्वी चर्चेनंतर, भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना 'सुरक्षित मार्ग' (Safe Passage) देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काल रात्रीच भारताचे 'शिवालिक' हे एलपीजी जहाज कोणतीही अडचण न येता हा मार्ग पार करून सुरक्षितपणे बाहेर पडले. मात्र, तरीही सावधगिरी म्हणून भारताने रशियाकडून येणाऱ्या तेलाचे प्रमाण वाढवले आहे.
अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई
दुसरीकडे, इराणच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने आता आपली ताकद पणाला लावली आहे. अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक आणि 3 बलाढ्य युद्धनौका फायटर जेट्सच्या ताफ्यासह आखाती देशांकडे रवाना झाल्या आहेत. अमेरिकन नौदल व्यापारी जहाजांना लष्करी संरक्षण देऊन या मार्गातून नेण्याची तयारी करत आहे का? असाही सवाल उपस्थित झाला आहे. ज्यामुळे इराण आणि अमेरिका आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.
जगावर आर्थिक संकट
या नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर तेल 200 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका युरोपीय देशांना बसत असून अनेक देशांत इंधन रेशनिंग सुरू झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
