Iran War Live Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त करण्याची, स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडा न केल्यास देशाला ‘अश्मयुगात’ ढकलण्याची दिलेल्यानंतर इराणमध्ये इस्लामिक क्रांतीनंतर अभूतपूर्व एकजूट दिसून आली. ट्रम्प यांच्या अश्मयुगातील धमकीनंतर इराण सरकारने ‘जनफदा’ (बलिदान) मोहीम सुरू केली. इराणी राष्ट्राध्यक्षांसह 14 मिलियनहून अधिक नागरिकांनी देशासाठी बलिदानाची तयारी दर्शवली. तरुण, महिला, कलाकार आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून वीज प्रकल्प आणि पूलांभोवती मानवी साखळ्या करत अवघ्या जगाला इराणी निर्धार दाखवून दिला. हे चित्र इराणी जनतेच्या अटूट इच्छाशक्तीचे आणि राष्ट्रीय एकतेचे ज्वलंत उदाहरण ठरले. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदेत वारंवार इराणला इशारा दिला की, स्ट्रेट ऑफ होर्मुझ पूर्णपणे उघडा न झाल्यास ‘पॉवर प्लांट डे’ आणि ‘ब्रिज डे’ एकत्र येईल. अमेरिकन सैन्याकडे चार तासांत इराणचे सर्व पूल आणि वीज प्रकल्प नष्ट करण्याची योजना तयार असल्याची धमकी दिली. 

राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्वतः ट्विट केलं 

या पार्श्वभूमीवर इराणने शांततापूर्ण पण दृढ प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला. राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्वतः ‘जनफदा’ मोहिमेत नोंदणी करत ट्विट केले, “१४ मिलियनहून अधिक गर्विष्ठ इराणींनी आतापर्यंत देशासाठी जीव बलिदान देण्याची नोंदणी केली. मी स्वतःही इराणसाठी सदैव जीव देण्यास तयार आहे.” संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ यांनीही यात सहभाग घेत “14,376,758 +1. मोहम्मद बागेर घालिबाफ, इराणसाठी एक जनफदा” असे पोस्ट करत राष्ट्राला एकजूट दाखवली. सरकारने युवक, खेळाडू, कलाकार, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना विशेष आवाहन केले. अलिरेझा राहिमी यांच्या व्हिडिओ संदेशानंतर हजारो नागरिक, त्यात महिला आणि तरुणींसह, दमावंद, रामिन, बिस्तून सारख्या प्रमुख वीज प्रकल्पांजवळ आणि पुलांभोवती मानवी साखळ्या बनवून उभे राहिले. 

राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करण्यासाठी ‘मानवी ढाल’

देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करण्यासाठी ‘मानवी ढाल’अवघ्या जगाने पाहिल्यानंतर त्याचे पडसाद अमेरिकेत सुद्धा उमटले. काही ठिकाणी कुटुंबांसह मुलेही सहभागी झाली. एका इराणी संगीतकाराने दमावंद वीज प्रकल्पासमोर मॅटवर बसून पारंपरिक तार वाद्यावर गाणे गाऊन शांततापूर्ण प्रतिकार व्यक्त केला. कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेषतः या मोहिमेत सामील करण्यात आले. इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरने (आयआरजीसी) ने सुद्धा ट्रम्प यांच्या धमकीला कडक प्रतिसाद दिला. “रेड लाइन्स” ओलांडल्यास प्रदेशाबाहेर मोठा प्रतिसाद दिला जाईल, अमेरिका आणि त्यांच्या सहयोगींना तेल-गॅस पुरवठा वर्षानुवर्षे नाकारला जाईल आणि अश्मयुगाच्या धमक्यांना सर्वकाही उद्ध्वस्त करून प्रतिकार केला जाईल, असा इशारा दिला होता. 

हे सर्व घडत असताना इराणमध्ये राष्ट्रवादी भावना शिगेला पोहोचली. 14 मिलियन स्वयंसेवकांची संख्या ही केवळ आकडेवारी नाही, तर इराणी जनतेच्या सामूहिक इच्छाशक्तीचे, ऐतिहासिक गर्वाचे आणि आक्रमक धमक्यांसमोर न झुकण्याच्या निर्धाराचे प्रतीक ठरले. ट्रम्प यांनी दबाव वाढल्यानंतर युद्धविराम केला असला, तरी इराणने “आम्ही भयभीत नाही” असा स्पष्ट संदेश दिल्याने प्रचंड दबाव वाढला होता. बाह्य धमक्या इराणी समाजाला विखुरण्याऐवजी एकत्र आणणाऱ्या ठरल्या. जनफदा मोहीम, मानवी साखळ्या आणि नेत्यांचा स्वतःचा सहभाग यातून इराणने सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सन्मानासाठी कोणत्याही त्यागास तयार असल्याचे संदेश अवघ्या जगाला दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या