Iran vs Israel War: नवव्या दिवशीही इराण-इस्रायलचा संघर्ष सुरूच, तेहरानवर भीषण बॉम्बहल्ले, इराणमध्ये आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू; दुबईत मुंबईतील पर्यटक अडकले
Iran vs Israel War: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाच्या नवव्या दिवशी हल्ले आणि प्रतिहल्ल्यांची मालिका अधिक तीव्र झाली आहे.

Iran vs Israel War: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाच्या नवव्या दिवशी हल्ले आणि प्रतिहल्ल्यांची मालिका अधिक तीव्र झाली आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठे हवाई हल्ले चढवले असून शहराच्या अनेक भागांत स्फोटांचे आवाज एकू आले. या हल्ल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात धुराचे ढग उसळले असून काही ठिकाणी आग लागल्याचेही वृत्त आहे.
शनिवारी उशिरा रात्री तेहरानच्या पूर्व आणि दक्षिण-पश्चिम भागांमध्ये इस्रायली वायुसेनेने सलग एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांनंतर शहराच्या आकाशात स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले आणि अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते.
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प याचा इराणला थेट इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला कठोर इशारा दिल्यानंतर लगेचच हे हल्ले झाल्याचे सांगितले जात आहे. “इराणने शरणागती पत्करली नाही तर जोरदार हल्ला होईल,” असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. याआधी इस्रायली सैन्याने तेहरानमधील एका विमानतळावर हल्ला केल्याचेही जाहीर केले होते. हा विमानतळ मध्यपूर्वेतील इराण समर्थित गटांना शस्त्रास्त्र पोहोचवण्यासाठी वापरला जात असल्याचा इस्रायलचा दावा आहे.
Iran vs Israel War: इराणमध्ये किमान 1,200 हून अधिक जणांचा मृत्यू
या संघर्षाला सुरुवात होऊन आठवडा उलटल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. विविध देशांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत इराणमध्ये किमान 1,200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये 290 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून इस्रायलमध्येही अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
Iran vs Israel War: लेबनॉनमध्येही ड्रोनद्वारे मोठा हल्ला
दरम्यान, लेबनॉनमध्येही इस्रायलने ड्रोनद्वारे मोठा हल्ला केल्याचे वृत्त आहे. बेरूत शहरातील एका हॉटेलवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच रात्री उशिरा झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात 45 जण ठार झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना दुबईमध्येही ड्रोन हल्ल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. दुबई मरीना परिसरातील ‘स्टार टॉवर’वर ड्रोन हल्ला करण्यात आल्याने इमारतीचे मोठे नुकसान झाले. या घटनेत इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
Iran vs Israel War: मुंबईतील पर्यटक दुबईमध्ये अडकले
या युद्धाचा फटका पर्यटकांनाही बसत आहे. दुबईमध्ये अनेक भारतीय अडकले असून मुंबईतील सुरेश चव्हाण आणि त्यांची पत्नी देखील तिथेच अडकून पडले आहेत. वारंवार उड्डाणे रद्द होत असल्याने आणि औषधांची अडचण निर्माण झाल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा





















