नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष चर्चेतून संपण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुढील 30 दिवसात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांची संख्या पहिल्यासारखी होईल, असं इराणकडून जाहीर करण्यात आलंआहे. म्हणजेच अमेरिका आणि इराण युद्ध सुरु होण्यापूर्वी ज्या प्रमाणात जहाज होर्मुझमधून जात होती तितक्या संख्येनं जाऊ शकतात. ही जगभरातील विविध देशांसाठी दिलासा देणारी अपडेट आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जवळपास आंतरराष्ट्रीय इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के वाहतूक होते. अमेरिका आणि इराण युद्धामुळं होर्मुझचा मार्ग बंद झाल्यानं आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार होर्मुझवरुन एक सहमती होत आहे. मात्र, इराणकडून देखील काही बाबी स्पष्ट करण्यात आल्यात, त्यानुसार होर्मुझमधील स्थिती युद्धाच्या पूर्वी होती तशी होईलच असं नाही. पाश्चिमात्य माध्यमांकडून होर्मुझमधील स्थिती पूर्ववत होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, याबाबतचं वृत्त इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेकडून फेटाळण्यात आलं आहे. तसनीम वृत्तसंस्थेच्या दाव्यानुसार या कराराची व्याप्ती मर्यादित असेल.
रिपोर्टनुसार पुढील 30 दिवसांमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीत 30 दिवसात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या कमर्शिअल जहाजांची संख्या हळूहळू युद्धाच्या अगोदर असलेली स्थिती निर्माण करण्यासाठी योजना तयार केली जात आहे.इराणच्या आर्थिक घडामोडी सुरु होतील, ज्यामुळं थोडासा दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय शिपिंगला वेग मिळेल. मात्र, सुरक्षा आणि रणनीती पहिल्यासारखी नसेल.
गेल्या काही महिन्यात आखाती देशांमध्ये तणाव वाढला होता. अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणवर हल्ले केल्यानंतर इराणनं देखील आखाती देशांमध्ये जिथं अमेरिकन लष्करी तळ असेल त्या देशांवर हल्ले केले होते. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं जगाला होणाऱ्या तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जगभरात क्रूड ऑईलचे दर आणि बाजाराच्या स्थिती वर परिणाम झाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमेरिका, इराण आणि त्या भागातील काही देशांसोबत लकवरकच एक करार होईल असं म्हटलं. या करारामध्येच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्याचा समावेश असून त्याची लवकरच घोषणा केली जाईल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ले सुरु केल्यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत अमेरिकेची कोंडी केली होती. होर्मुझमधून विनापरवाना जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून हल्ले करण्यात आले होते.
