Iran Israel War : इराणमध्ये अलीकडील संघर्षानंतर देशातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी (Ayatollah Khamenei) यांच्या निधनानंतर सत्तेचा वारसा, लष्करी नियंत्रण आणि जनतेच्या अपेक्षा यांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. वर्षभरापूर्वीच खामेनी यांनी आपला वारसदार घोषित केला असला तरी आता 47 वर्षांपूर्वी देश सोडावा लागलेले निर्वासित राजपुत्र रझा पहलवी पुन्हा चर्चेत आले आहेत.
'ज्या दिवशी मी इराण सोडला, त्या दिवसापासून मी मनानं कधीच इराण सोडला नाही, इराण माझ्या मनात नेहमीच होता' असं रझा पहलवी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. तब्बल 47 वर्षे इराणबाहेर राहिल्यानंतर ते पुन्हा देशात परतण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
Iran Political Crisis : सत्तासंघर्षाची नवी दिशा
अमेरिकेविरुद्धच्या संघर्षात इराणमधील अनेक वरिष्ठ नेते मारले गेल्यानंतर नेतृत्वाचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. अयातुल्ला खामेनी यांनी मोजतबा खामेनी यांना वारसदार म्हणून पुढे केल्याची चर्चा असताना, रझा पहलवी हेही पर्यायी नेतृत्व म्हणून समोर येत आहेत. त्यामुळे इराणमध्ये राजेशाही समर्थक आणि इस्लामिक राजवट समर्थक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Iran Protests Support : जनआंदोलनांना बाहेरून पाठिंबा
इराणमध्ये डिसेंबरपासून सुरू झालेल्या तीव्र जनआंदोलनांच्या पार्श्वभूमीवर रझा पहलवी यांनी सक्रिय भूमिका घेतली होती. त्यांनी परदेशातून इराणी जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केलं. त्यांच्या एका आवाहनानंतर जानेवारीत राजधानी तेहरानमध्ये लाखो आंदोलक रस्त्यावर उतरल्याचा दावा करण्यात आला. या आंदोलनांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण केला.
Who is Reza Pahlavi : रझा पहलवी कोण आहेत?
इराणचे माजी शाह मोहम्मद रझा पहलवी यांचे पुत्र रझा पहलवी यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1960 रोजी झाला. 1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी त्यांना अधिकृतपणे युवराज घोषित करण्यात आले होते. मात्र इस्लामिक क्रांतीनंतर राजेशाही संपुष्टात आली आणि पहलवी कुटुंबाला देश सोडावा लागला.
रझा पहलवी यांनी अमेरिकेत शिक्षण घेत राज्यशास्त्रात पदवी संपादन केली. ते प्रशिक्षित लढाऊ वैमानिकही आहेत. गेली चार दशकं त्यांनी इस्लामिक राजवटीविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहीम राबवली. ‘इराण प्रॉस्पेरिटी प्रोजेक्ट’ या माध्यमातून त्यांनी भविष्यातील इराणचा विकास आराखडा मांडला आहे.
Future of Iran Leadership : पुढचा मार्ग किती कठीण?
रझा पहलवींबाबत अनेक इराणी नागरिकांमध्ये आपुलकीची भावना असली तरी प्रत्यक्षात सत्तांतर घडवून आणणे सोपे नाही. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स, धार्मिक नेतृत्व आणि विद्यमान सत्ताकेंद्रे यांच्यातील शक्तिसंतुलन मोठे आव्हान ठरू शकते. इतक्या वर्षांनी इराणमध्ये परतून सक्रिय राजकारणात उतरणे हे त्यांच्या दृष्टीने मोठे राजकीय धाडस ठरणार आहे.
आता प्रश्न असा आहे की, इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचा पर्याय मजबूत होणार का, की इस्लामिक नेतृत्वाचाच वारसा पुढे चालू राहणार? येणारे काही महिने इराणच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.
ही बातमी वाचा:
