नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु होऊन 24 दिवस झाले आहेत. अमेरिकेनं इराणला होर्मुझची सामुद्रधुनी 48 तासात खुली केली नाही तर ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. मात्र, 48 तासांची मुदत संपण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. सध्या चर्चा चांगल्या प्रकारे सुरु असून युद्ध विभागाला 5 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर इराणच्या मीडियाकडून ट्रम्प यांची खिल्ली उडवली जातेय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं असलं तरी इराणकडून अशा प्रकारची चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. इराणमधील माध्यमांनी विदेश मंत्रालयाच्या हवाल्यानं म्हटलं तेहरान आणि वॉशिंग्टनमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प सध्या अशा प्रकारची वक्तव्य क्रूड ऑईलचे दर कमी करण्यासाठी आणि सैन्य कारवाईसाठी वेळ मिळावा म्हणून करत असल्याचं इराणच्या मीडियाकडून सांगण्यात आलं आहे.
इराणच्या विदेश मंत्रालयानं म्हटलं की या भागातील विविध देशांशी तणाव कमी करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. मात्र, अमेरिकेनं युद्ध सुरु केलं होतं, मात्र सर्व प्रकारच्या आवाहनावर अमेरिकेनं विचार केला पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रथ सोशल वर पोस्ट करुन म्हटलं होतं की ऊर्जासाधनांवरील हल्ले पाच दिवस थांबवत आहोत. इराणच्या मीडियाकडून या बाबतीत ट्रम्प यांची खिल्ली उडवण्यात येत असून त्यांची ही माघार असल्याचं म्हटलं.
इराणच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी म्हटलं की अमेरिकेकडून चर्चा सुरु असताना हल्ले केले. अमेरिकेसोबत चर्चा करण्याचा काही चांगला अनुभव नाही. आम्ही आमच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करत आहोत, असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे सैन्य तळ असलेल्या देशातील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करु : इराण
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत दिली होती. या 48 तासात इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी, असं म्हटलं होतं. मात्र, इराणनं तसं न केल्यास त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करु असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. तर, इराणकडून देखील डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. जर अमेरिकेनं इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल आणि ऊर्जा प्रकल्पांची दुरुस्ती होईपर्यंत ती बंद ठेवली जाईल, असं ट्रम्प म्हणाले.
इस्त्रायलच्या ऊर्जा आणि आयसीटी आस्थापनांवर हल्ले करण्याचा इशारा इराणनं दिला आहे. मध्य आशियातील ज्या देशात अमेरिकेचे सैन्य तळ आहेत, त्या देशातील ऊर्जा प्रकल्पांवर देखील हल्ले करु असा इशारा इराणनं दिला होता.
