Iran Vs US War : पश्चिम आशियात (Middle East) आधीच सुरू असलेला तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. इराणने (Iran) अमेरिकेच्या विरोधात थेट युद्ध पुकारत Eye For An Eye Operation या मोहिमेअंतर्गत आखाती देशांमधील अमेरिकन एअरबेसवर (US Airbase) भीषण हल्ला केल्याचा दावा केला आहे. स्ट्रॅटेजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे अमेरिकेचे 'पेट्रियट एअर डिफेन्स सिस्टम' (Patriot Air Defense System) आणि रडार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) सोमवारी केला आहे. या हल्ल्याचा एक कथित व्हिडीओही समोर आला असून यामुळे जागतिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Iran US Airbase Attack : तीन टप्प्यांत 'आय फॉर एन आय' लष्करी हल्ला
इराणची सरकारी वृत्तसंस्था 'नूर न्यूज'ने (Noor News Agency) लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेकडून इराणवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी हे सर्वात मोठे लष्करी ऑपरेशन राबवण्यात आले. इराणच्या सैन्याने आणि आयआरजीसीने सलग 48 तास शत्रूच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून हा हल्ला केला. हा संपूर्ण हल्ला तीन टप्प्यांत (Three Stages) करण्यात आला:
पहिला टप्पा (जॉर्डनवर हल्ला): पहिल्या टप्प्यात इराणच्या एरोस्पेस फोर्सने जॉर्डनमधील अमेरिकेच्या 'प्रिन्स हसन एअरबेस'ला (Prince Hassan Airbase) निशाणा बनवले. अमेरिकेने आपले ट्रॅकिंग सिस्टीम बंद करून आंतरराष्ट्रीय हवाई नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणने केला आहे.
दुसरा टप्पा (बहरीनवर हल्ला): दुसऱ्या टप्प्यात इराणच्या अत्याधुनिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी बहरीनमधील अमेरिकेच्या 'शेख ईसा एअरबेस'वर (Shaikh Isa Airbase) जोरदार मारा केला.
तिसरा टप्पा (कुवेतमध्ये प्रचंड नुकसान): तिसरा आणि सर्वात घातक हल्ला कुवेतमध्ये झाला. येथे अमेरिकेच्या 'अली सालेम एअरबेस'वरील (Ali Al Salem Airbase) मुख्य इंधन टाक्या (Fuel Tanks) आणि महाशक्तीशाली पेट्रियट एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा इराणने केला आहे. तसेच 'अहमद अल जाबेर एअरबेस'वरील महत्त्वाचे 'FPS रडार सिस्टीम'ही उडवून देण्यात आली आहे.
Warning on Strait of Hormuz : अमेरिकेला 'हॉर्मुझ'वरून शेवटचा इशारा
हा हल्ला केल्यानंतर इराणने अमेरिकेला आणि पाश्चात्य देशांना अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराण आपल्या सीमांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. आखाती देश आणि विशेषतः हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या जागतिक व्यापारी सागरी मार्गावर अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप किंवा दादागिरी सहन केली जाणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.
इराणच्या सरकारी मीडियाने या हल्ल्याचे दावे आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले असले, तरी अमेरिकन संरक्षण मुख्यालय 'पेन्टागॉन' किंवा बहरीन, कुवेत आणि जॉर्डनच्या सरकारांनी अद्याप या मोठ्या नुकसानीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र, या दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची आणि आखातात पूर्ण क्षमतेने युद्ध पेटण्याची भीती निर्माण झाली आहे.
ही बातमी वाचा:
