Indian Origin Brothers Sentenced to 835 Years Jail: अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या दोन भावांच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. भास्कर सावनी आणि अरुण सावनी या बंधूंनी वर्षानुवर्षे विविध मार्गांनी फसवणूक करून करोडो रुपयांची कमाई केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. मोठ्या पदांवरील व्यक्तींशी फोटो काढून समाजात प्रभाव निर्माण करणाऱ्या या भावांचे कारनामे तपास सुरू होताच एकामागोमाग एक उघडकीस येऊ लागले. मेडिकेड आरोग्य विमा कार्यक्रम आणि H-1B व्हिसा प्रणाली या अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या सरकारी योजनांमधून या बंधूंनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायासह संपूर्ण देशात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Corut: न्यायालयाने दोषी ठरवले

न्यायालयाने भास्कर सावनी (वय 60) (Bhaskar Savani) आणि अरुण सावनी (वय 58) (Arun Savani) या दोघांना अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या गुन्हेगारी कटात दोषी ठरवले आहे. व्हिसा फसवणूक, आरोग्यसेवा फसवणूक, मनी लाँडरिंग आणि करचोरी अशा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर दोष सिद्ध झाला आहे.

सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, या भावांनी “सावनी ग्रुप” नावाने कंपन्यांचे विस्तृत जाळे उभारले होते. या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे बेकायदेशीर मार्गांनी लाखो डॉलर्सची कमाई केली. तपास यंत्रणांच्या मते, हा घोटाळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आला होता.

Indian Origin Brothers Sentenced to 835 Years Jail: 835 वर्षांच्या कारावासाची शक्यता

अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील शिक्षा अत्यंत कठोर असू शकते. न्यायालयाकडून भास्कर सावनी यांना 420 वर्षे तर अरुण सावनी यांना 415 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. दोघांची शिक्षा एकत्र केल्यास तब्बल 835 वर्षांच्या कारावासाचा सामना त्यांना करावा लागू शकतो.

भास्कर सावनी हे व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) असून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित फसवणुकीत त्यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या भावांनी कंपन्या आणि संलग्न संस्थांच्या माध्यमातून गुन्हेगारी साखळी उभी केली होती. या साखळीचा उद्देश सरकारी योजनांचा गैरवापर करून आर्थिक फायदा मिळवणे हा होता.

Allegations of H-1B Visa Fraud : H-1B व्हिसा फसवणुकीचा आरोप

सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, सावनी ग्रुपने परदेशी कामगारांची भरती करण्यासाठी बनावट व्हिसा अर्ज आणि याचिका दाखल केल्या. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगारांचा समावेश होता. कामगारांना नोकरी मिळाल्यानंतर विविध शुल्क भरण्यास भाग पाडले जात असे. याशिवाय त्यांच्या वेतनाचा काही भाग सावनी ग्रुपला परत करण्यासही त्यांना दबाव टाकला जात होता. इमिग्रेशन स्टेटससाठी कर्मचारी कंपनीवर अवलंबून असल्याने या परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचे आरोप आहेत.

Medicaid Healthcare Scam: मेडिकेड आरोग्यसेवा घोटाळा

या बंधूंवर अमेरिकेतील मेडिकेड आरोग्य विमा कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचाही आरोप आहे. सावनी ग्रुपशी संबंधित दंतवैद्यकीय क्लिनिकना मेडिकेड विमा करारातून वगळण्यात आल्यानंतरही त्यांनी मेडिकेडकडून पैसे घेणे सुरूच ठेवले होते.

Fake medical bills: बनावट वैद्यकीय बिले

तपासात असेही उघड झाले की, दुसऱ्या डेंटिस्टचा नॅशनल प्रोव्हायडर आयडेंटिफायर (NPI) वापरून खोट्या बिलांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या तारखांना ही बिले सादर करण्यात आली, त्या काळात संबंधित डेंटिस्ट देशाबाहेर होते. काही प्रकरणांमध्ये प्रमाणित परवानाधारक नसलेल्या दंतवैद्यांकडून उपचार करूनही त्यांची बिले मेडिकेडकडे सादर करण्यात आली. त्यामुळे आरोग्यसेवा नियमांचे गंभीर उल्लंघन झाले.

Money Laundering : मनी लाँडरिंग आणि करचोरी

सरकारी वकिलांनी सांगितले की, आरोग्यसेवा फसवणुकीतून मिळालेला पैसा सावनी ग्रुपशी संबंधित विविध कॉर्पोरेट बँक खात्यांमधून फिरवून लपवला जात होता. या प्रक्रियेद्वारे मनी लाँडरिंग करण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात कर आणि वायर फसवणूकही उघडकीस आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही भावांनी सुमारे 1.6 दशलक्ष डॉलर्सचे वैयक्तिक उत्पन्न आणि 1.1 दशलक्ष डॉलर्स इतक्या कर्मचाऱ्यांच्या अनोंदित उत्पन्नावर कर भरला नाही. तसेच कॉलेज फी, मालमत्ता कर आणि घरांच्या देखभालीसारखे वैयक्तिक खर्च व्यवसाय खर्च म्हणून दाखवून कर टाळल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चौकशी सुरू असतानाही आणि 2023 मध्ये त्यांच्यावर आरोप दाखल झाल्यानंतरही सावनी बंधू सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांनी एफबीआय संचालक काश पटेल यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला होता.

Final sentence in July 2026: जुलै 2026 मध्ये अंतिम शिक्षा

या प्रकरणातील अंतिम शिक्षा जुलै 2026 मध्ये सुनावली जाणार आहे. भास्कर सावनी यांच्यासाठी 8 जुलै आणि अरुण सावनी यांच्यासाठी 9 जुलै ही सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या त्यांच्या सहकारी अलेक्झांड्रा राडोमियाक हिलाही दोषी ठरवण्यात आले असून तिलाही 40 वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि मोठ्या दंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेतील आरोग्य व्यवस्था, व्हिसा प्रणाली आणि आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रणाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा 

LPG Gas Shortage: गॅस सिलिंडर अचानक संपण्याची भीती? घरबसल्या 'या' 3 सोप्या ट्रिक्सने लगेच करा चेक