सिंगापूर: भारतीय वंशाच्या मलेशियन व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागेंद्रन के. धर्मलिंगम असे आरोपीचे नाव असून तो 33 वर्षांचा आहे. बुधवारी धर्मलिंगम याला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी धर्मलिंगम याला अटक करण्यात आली होती. आरोपीला आपण कोणता गुन्हा करत आहोत, याची कल्पना होती, असे सिंगापूर सरकारने म्हटले. 


धर्मलिंगम याला 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. सिंगापूर आणि पेनिनसुलर मलेशिया दरम्यानच्या 'कॉजवे लिंक'वर वुडलँड्समध्ये धर्मलिंगम याच्याकडून 42.72 ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले होते. त्याच्या मांडीवर औषधांची पाकिटे लावण्यात आली होती. त्यातून अंमली पदार्थाची तस्करी सुरू होती. धर्मलिंगमल याच्याविरोधात खटला चालवण्यात आला आणि 2010 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 


अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार 15 ग्रॅमपेक्षा अधिक अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येते. धर्मलिंगमला येत्या 10 नोव्हेंबर रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. सिंगापूरमधील चांगी तुरुंगात त्याला मृत्यूदंड देण्यात येणार आहे. 


कुटुंबीयाची होणार भेट?


दोषी धर्मलिंगमची त्याच्या कुटुंबीयांसोबत 10 नोव्हेंबरपर्यंत भेट होणार असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा झाली. मानवाधिकार गट आणि इतर संस्थांनी मानसिक आजाराच्या मुद्यावर फाशीची शिक्षा न देण्याची मागणी केली होती. मात्र, दोषीला आपण कोणते कृत्य करत आहोत, याची त्याला कल्पना होती. असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोषी धर्मलिंगमची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली.


शिक्षेविरोधात अपील 


आरोपी धर्मलिंगम याने शिक्षेविरोधात न्यायलयात अपील केले होते. मात्र, 2011 मध्ये त्याचे अपील फेटाळण्यात आले. त्यानंतर त्याने मृत्यूदंडाच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत व्हावे यासाठीही अपील केले. मात्र, उच्च न्यायलयाने त्याचा अर्ज दोनदा फेटाळला. धर्मलिंगम याने 2017 आणि 2019 मध्ये अशाप्रकारचा अर्ज केला होता. राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला.