Iran vs Israel War: इस्रायलकडून सध्या इराणवर जोरदार हवाई हल्ले सुरु आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा अविरत मारा करुन इस्रायलने इराणची (Iran) राजधानी असलेल्या तेहरानमधील मोठा परिसर उद्ध्वस्त केला आहे. अशावेळी इस्लामी राष्ट्र असलेला पाकिस्तान इराणच्या मदतीला धावून जाणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. इस्रालयने (Israel) इराणवर अणुहल्ला केला तर पाकिस्तान (Pakistan) इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल, असा दावा एका इराणी अधिकाऱ्याने केला होता. तुर्तास पाकिस्तानने हा दावा फेटाळून लावला आहे. परंतु, भविष्यात पाकिस्तान इराणच्या बाजूने युद्धात उतरला तर इस्रायलचे किती नुकसान होऊ शकते, याची चर्चा सध्या रंगली आहे. भारताकडून सपाटून मार खाणारा पाकिस्तान इस्रायलसमोर किती काळ तग धरु शकतो, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

Pakistan Army Nuclear weapons: पाकिस्तानकडे किती अणवस्त्रं?

सूत्रांच्या माहितीनुसार, 2023 सालापर्यंत पाकिस्तानकडे 170 अणवस्त्रं होती. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आणि फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस् या दोन संस्थांच्या माहितीनुसार, पाकिस्तान हा सातत्याने आपली अणवस्त्रं क्षमता वाढवत राहिला आहे. त्यामुळे आतापर्यंत पाकिस्तानकडे 200 ते 250 अणवस्त्रं असतील. 

Israel Army Nuclear weapons: इस्रायलकडे किती अणवस्त्रं आहेत?

इस्रायलने आजपर्यंत त्यांच्याकडे किती अणवस्त्रं आहेत, याचा पत्ता जगाला लागून दिलेला नाही. परंतु, इस्रायलकडे सध्याच्या घडीला 90 ते 300 अणवस्त्रं असावीत, असा अंदाज आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस् (FAS) या संस्थेने तसा दावा केला आहे. इस्रालयने अणुकरारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे इस्रायलकडे असणाऱ्या अणवस्त्रांची संख्या अद्याप जगाला कळालेली नाही.

 Pakistan Army: पाकिस्तानकडे किती सैन्य?

पाकिस्तानी सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी दरवर्षी 10 अब्ज डॉलर्सची तरतूद केली जाते. पाकिस्तानकडे सध्या 6.6 लाख सैनिक, 2.91 लाख निमलष्करी जवान, 812 फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट, 322 हेलिकॉप्टर्स, 4619 तोफा, 6137 एएफव्ही आहेत. पाकिस्तानकडे लहान पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने पाणबुडीतून डागता येणाऱ्या अणवस्त्र सज्ज क्षेपणास्त्रांची मागणी केली होती. पाकिस्तानच्या हवाई दलाकडे 1434 विमाने आहेत. त्यापैकी 328 लढाऊ विमानं, 57 लढाऊ हेलिकॉप्टर्स आणि एफ-16 आणि जेएफ-17 थंडर यासारखी अत्याधुनिक बनावटीची विमाने आहेत. 

Israel Army Strength: इस्रायलची लष्करी ताकद किती?

लोकसंख्येच्यादृष्टीने इस्रायल हा पाकिस्तानच्या तुलनेत लहान देश असला तरी त्यांच्याकडे जगातील सामर्थ्यशाली लष्कर आहे. याशिवाय, अनेक युरोपीय देशांचाही इस्रायलला कायम पाठिंबा असतो. इस्रायलकडे 1 लाख 70 हजार सक्रिय सैनिक आहेत. तर 4 लाख राखीव सैनिक आहेत. इस्रायली सैन्याकडे कमी मनुष्यबळ असले तरी त्याची उणीव अत्याधुनिक शस्त्रं आणि विमानांनी भरुन निघते.

इस्रायलच्या हवाई दलाकडे 612 विमानं आहेत. यापैकी 146 हेलिकॉप्टर्स आणि 241 लढाऊ विमाने आहेत. याशिवाय, इस्रायलकडे 1370 रणगाडे, 43,407 चिलखती वाहने आहेत. तसेच रॉकेट डागणाऱ्या 150 तोफा आहेत. याशिवाय, 650 स्वयंचलित तोफ यंत्रणाही इस्रायलकडे आहेत. आखाती देशांमध्ये इस्रायली लष्कर हे सर्वात शक्तिशाली मानले जाते. याशिवाय, अमेरिककडून सातत्याने मिळणारी रसद ही इस्रालयची मोठी ताकद मानली जाते.

आणखी वाचा

इराण-इस्रायल युध्दाचा भारताला काय फटका बसणार? समजून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे