Massive Protest in Nepal : नेपाळमध्ये (Nepal)  हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) पुनर्स्थापित करण्याची मागणी जोर धरत आहे. नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही यावी या मागणीसाठी देशातील सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.  ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. आज (28 मार्च, 2025) निदर्शकांनी  काठमांडूच्या तिनकुने येथे हिंसक निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी एका इमारतीची तोडफोड करुन ती पेटवून दिल्याची घटना घडली आहे. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक जण जखमी झाले आहेत.

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, शांततापूर्ण मार्गाने सुरू झालेल्या या निषेध रॅलीला अचानक हिंसक वळण लागले आणि त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये अनेक सुरक्षा कर्मचारी आणि अनेक लोक जखमी झाले. हिंसक निदर्शनांनंतर नेपाळच्या गृहमंत्रालयाने तिनकुने आणि काठमांडूमध्ये कर्फ्यू जाहीर केला आहे.

रॅलीत योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर

राजेशाही समर्थकांच्या रॅलीत नेपाळला हिंदू राष्ट्र करण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीत आंदोलकांच्या हातात योगी आदित्यनाथ यांचे एक मोठे पोस्टरही दिसले, ज्यामध्ये त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक दाखवण्यात आले होते.

कसा झाला हिंसाचार?

सकाळपासून संयुक्त आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. आंदोलक तिनकुणे परिसरात जमा झाले होते. मात्र गर्दी वाढल्याने परिस्थिती बिघडू लागली. आंदोलकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून त्या पेटवून दिल्या. सुरक्षा कठडा तोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली.

पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक

आंदोलकांनी सुरक्षा घेरा तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा अवलंब केला. त्याचवेळी आंदोलकांनी इमारतीची तोडफोड आणि आग लावली, पोलिसांवर दगडफेक केली आणि सरकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. या काळात अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा दलांची तैनाती वाढवली.

नवराज सुबेदी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आंदोलन समितीच्या वतीनं आंदोलन 

नवराज सुबेदी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला वादग्रस्त व्यापारी दुर्गा प्रसादी आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते राजेंद्र लिंगदेन यांनी पाठिंबा दिला होता. नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र आणि घटनात्मक राजेशाहीत रूपांतरित करावे, अशी समितीची मागणी आहे. अनेक उजव्या विचारसरणीचे गट या चळवळीला चालना देत आहेत. मात्र, नेपाळच्या सेक्युलर होण्याच्या निर्णयावर काही वर्ग नाराज आहेत.

नेपाळमध्ये राजेशाही आणण्याची मागणी का वाढतेय?

2008 मध्ये नेपाळला संवैधानिक राजेशाहीतून काढून धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित करण्यात आले होते. परंतु काही कट्टरवादी गट आणि हिंदू संघटनांचे असे मत आहे की नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र बनवले पाहिजे. समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की नेपाळची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख वाचवण्यासाठी राजेशाही आवश्यक आहे. जनता धर्मनिरपेक्ष सरकारवर खूश नाही. त्याचवेळी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही नेपाळची नवी ओळख बनल्याचा युक्तिवाद विरोधकांनी केला आहे. राजेशाहीचे पुनरागमन नेपाळला मागे नेईल.