नवी दिल्ली: जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिज सईदच पाकिस्तानचा खरा पंतप्रधान आहे. तसेच सध्याच्या भौगोलिक परिस्थितीत पाकिस्तानचं अस्तित्वच चुकीचं आहे, अशी फटकेबाजी पाकिस्तानमध्ये जन्मलेले, मात्र सध्या कॅनेडाचे नागरिक असलेले प्रसिद्ध लेखक तारिक फतेह यांनी शनिवारी केली.


कराचीमध्ये जन्मलेल्या फतेह यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ही टोलेबाजी केली. ते म्हणाले की, ''मला माहित नाही की, तुम्ही भारतीय इतके गंभीर का असता. तुम्हाला देश कोण चालवतं हेच कळलं नाही. जमात-उद-दावाच्या सैनिकांनी 10 महिन्यात 30 लाख बंगाली नागरिकांची हत्या केली. तसेच बलुच तरुणांनाही विमानातून फेकत आहेत. याशिवाय तरुणींवरही अनन्वित अत्याचार होत आहेत.''

ते पुढे म्हणाले की, '' जेव्हा 1971च्या युद्धातील 90 हजार पाकिस्तानी युद्धबंदींची इंदिरा गांधींनी सुटका केली, तेव्हा त्यांना 1973 ते 1975 दरम्यान बलुचिस्तानमध्ये पुन्हा निरपराधांचे हत्याकांड घडवून आणण्यासाठी तैनात करण्यात आले.''

'पाकिस्तान देश नव्हे विनोद'

पाकिस्तानने स्वत:ला अनेक नावे लावून घेतलेली आहेत. हा आता देश राहिला नाही, तर तो आपल्या सर्वांसोबत केला गेलेला एक विनोद असल्याचेही, ते यावेळी म्हणाले.

बलुचिस्तानचा भूभाग पाकिस्तानी सैन्याने बळकावला

यावेळी बोलताना बालुचिस्तानच्या स्वातंत्र्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की बलुचिस्तान स्वतंत्र होता, मात्र 1947 साली पाकिस्तानी सैन्याने जबरदस्तीने हा भाग बळकावला आहे.

हाफिज सईदच पाकिस्तानचा पंतप्रधान

तसेच त्यांनी यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानी सैन्यदल प्रमुख राहिल शरीफ यांच्या कार्यप्रणालीवरही हल्ला चढवला. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ नसून हाफिज सईद आहे, तर हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाउद्दीन हाच पाकिस्तानचा संरक्षण मंत्री आहे.

तारिक फतेह कोण आहेत?

फतेह हे एक उदारमतवादी लेखक असून मुस्लीम कॅनेडियन काँग्रेसचे संस्थापक आहेत. कराचीमध्ये जन्मलेले फतेह सध्या कॅनेडामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या तीक्ष्ण लेखणीमुळे ते सदैव पाकिस्तानातील कट्टर विचारांच्या मुस्लीम संघटनांचे लक्ष्य असतात.