Gujarat Maharashtra Day 2026: न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांनी ‘गुजरात-महाराष्ट्र दिन 2026’ मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वैभवात साजरा केला. गुजराती असोसिएशन्स ऑफ नॉर्थ अमेरिका (GANA), न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावास आणि फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स (FIA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सोहळा 1 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय वंशाचे नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकात्मता, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जपणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Gujarat Maharashtra Day 2026: संस्कृती आणि परंपरेचा संगम

कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तुतीने झाली. त्यानंतर विविध भाषणे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि सन्मान सोहळे पार पडले. गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये भारताच्या आर्थिक व सांस्कृतिक बळाची प्रतीके असून जागतिक पातळीवर त्यांचा प्रभाव असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका फालू शाह यांनी सुमधुर गायन सादर केले. हार्दिक चौहान यांनी गुजराती लोकसंगीताचा ठेका न्यूयॉर्कमध्ये अनुभवायला लावला. ‘डान्सिंग स्टार्स’ या युवा गटाने गणपती परंपरा, गरबा आणि दांडिया यांचा फ्युजन नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

Gujarat Maharashtra Day 2026: खाद्यसंस्कृतीचा खास स्पर्श

या सोहळ्यातील विशेष आकर्षण म्हणजे शाकाहारी जेवण. समुदायातील महिलांनी आणि पुरुषांनी घरगुती पारंपरिक पदार्थ सादर केले, ज्यामुळे भारतीय संस्कृतीतील ‘घरचा स्वाद’ अनुभवायला मिळाला. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा भारताच्या GDP मध्ये सुमारे 25 टक्के वाटा असल्याचे सांगितले. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी भारताच्या संघराज्य रचनेची तुलना संयुक्त कुटुंबाशी केली.

Gujarat Maharashtra Day 2026: भारतीय-अमेरिकन नेत्यांचा सन्मान

न्यू जर्सीतील वेस्ट विंडसरचे महापौर हेमंत मराठे आणि पार्सिपनी-ट्रॉय हिल्सचे महापौर पुलकित देसाई यांचा सन्मान करण्यात आला. अभिनेत्री अर्चना जोगळेकर आणि पूजा झावेरी यांचीही विशेष उपस्थिती होती. GANA चे अध्यक्ष सृजल परिख यांनी संस्थेच्या 10 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. FIA चे अध्यक्ष आणि सह-संस्थापक अंकुर वैद्य यांनी गुजराती आणि मराठी समाजाच्या सहकार्याचे कौतुक केले. विविधतेत एकता जपण्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. तर समारोप प्रसंगी समाजसेवक सौरिन दवे आणि केनी देसाई यांचा सन्मान करण्यात आला.

आणखी वाचा 

Assembly Election Results 2026: पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजपची मुसंडी, कोणत्या राज्यात कोण जिंकलं?