Iran War Live: इस्त्रायलने गॅसफिल्डवर हल्ला केल्यानंतर इराणने प्रतिहल्ला करत सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि यूएईमध्ये गॅस सुविधा आणि ऑईल रिफानयरींवर मिसाईली तसेच ड्रोनचा मारा केला आहे. सौदी अरेबियातील यान्बू बंदरात असलेल्या समरेफ तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ला झाला. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे, बहुतेक तेल आता यान्बू बंदरातून पाठवले जात आहे. याशिवाय, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कतारमधील तेल आणि वायू प्रकल्पांवर ड्रोन हल्ले झाले. इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील तेल प्रकल्पांची राख करण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या आक्रमक पावित्र्यानंतर सौदीने आज इराणला कडक इशारा दिला आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद म्हणाले की, इराणला प्रत्युत्तर देण्याची आमच्या देशात पूर्ण ताकद आहे. इराणचे हल्ले पूर्वनियोजित असल्याचे दिसते आणि त्यांनी आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.
इराणने चार देशांच्या गॅस सुविधांवर मिसाईली अन् ड्रोन डागले
रास लाफान इंडस्ट्रियल सिटी, कतार
कतारने माहिती दिली की, इराणच्या क्षेपणास्त्रांनी देशातील मुख्य गॅस सुविधा असलेल्या 'रास लाफान'वर हल्ला केला. यामध्ये प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिना अल-अहमदी रिफायनरी, कुवेत
कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले की, कुवेत शहरापासून 50 किमी दक्षिणेला असलेल्या 'मिना अल-अहमदी' रिफायनरीवर ड्रोन हल्ला झाला. यामुळे एका ऑपरेशनल युनिटला आग लागली, सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
मिना अब्दुल्ला रिफायनरी, कुवेत
कुवेतच्या दक्षिणेकडील 'मिना अब्दुल्ला' रिफायनरीवरही ड्रोनने हल्ला केल्यामुळे तिथे आग लागल्याची माहिती कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिली.
हबशान गॅस सुविधा आणि बाब ऑईलफिल्ड, यूएई (UAE)
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी रोखलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष पडल्यामुळे हबशान गॅस सुविधा आणि बाब ऑईलफिल्डमध्ये काही दुर्घटना घडल्या. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.
सामरेफ रिफायनरी, सौदी अरेबिया
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, यानबू बंदरावरील सौदी अरामकोच्या 'सामरेफ' (Samref) रिफायनरीवर एक ड्रोन आदळले. या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज सध्या घेतला जात आहे.
कतार-कुवेत हल्ल्यानंतर नैसर्गिक वायूच्या किमतीत 35 टक्के वाढ
दरम्यान, आखाती प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने आज युरोपमध्ये नैसर्गिक वायूच्या किमतीत 35 टक्के वाढ झाली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 28 फेब्रुवारी रोजी इराण युद्ध सुरू झाल्यापासून युरोपमध्ये वायूच्या किमती 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. जागतिक बेंचमार्क मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीही आज प्रति बॅरल 112 डॉलरपर्यंत वाढल्या. युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती 48 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. 13 मार्चपासून त्याची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आलेली नाही. मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धाचा ऊर्जा पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामाबाबत अनिश्चितता वाढतच आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
