Fly dubai Incident Marathi News: दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांचे जगभरातून कौतुक होत आहे. कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे विमान धोकादायकरीत्या खाली आले, मात्र कॅप्टन, प्रवासी आणि इतर क्रूच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली. आता कॅप्टन स्मिथ मच्छर यांच्यावर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. (Fly dubai Plane Incident Marathi News)

Continues below advertisement

कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती- (Fly dubai Captain Smit Machchhar)

फ्लायदुबईच्या 1073 क्रमांकाच्या विमानातील सह-वैमानिकाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनुसार, ज्या सह-वैमानिकाने कॅप्टनवर चाकूने वार केले आणि विमान जमिनीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल अतिरेकी विचारसरणी बाळगत असल्याचा संशय होता. त्यामुळेच ओमानने त्याला यापूर्वी विमान उडवण्यास बंदी घातली होती. या सह-वैमानिकाची ओळख 'हमाम अल-हम्मामी' अशी पटली असून, घटनेनंतर तीन दिवसांनी त्याचे नाव उघड झाले. विशेष म्हणजे बंदी असूनही फ्लायदुबईने या सह-वैमानिकाला कामावर घेतले आणि त्याने संयुक्त अरब अमिराती व इस्रायल यांना जोडणाऱ्या संवेदनशील मार्गावर विमान उडवण्यास सुरुवात केली. तसेच हमामीच्या अटकेनंतर त्याच्या बॅगेत विविध वस्तू सापडल्या. त्यामध्ये 'फ्री पॅलेस्टाईन' असे लिहिलेली पत्रकेही आढळून आली.

नेमकी घटना काय? (Fly dubai Incident Marathi News)

30 सप्टेंबर 2026 रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात हवेतच अत्यंत धक्कादायक घटना घडली. बोईंग 737 MAX 8 विमानाने दुबईहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते सुमारे 34 हजार फूट उंचीवरून सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीतून जात होते. विमानात 174 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. उड्डाण सुरळीत सुरू असतानाच कॉकपिटमध्ये कॅप्टन आणि सहवैमानिकामध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली. इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओमानी सहवैमानिकाने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर विमान अचानक वेगाने खाली येऊ लागले. मात्र, या घटनेतील नेमका क्रम आणि हल्ल्याचा उद्देश याबाबत अधिकृत तपास सुरू आहे. या घटनेदरम्यान विमानाची उंची अवघ्या 30 सेकंदांत 16 हजार फुटांहून अधिक कमी झाली. फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार विमानाने अचानक तीव्र वळण घेत खाली झेप घेतली, त्यानंतर काही प्रमाणात उंची मिळवली आणि पुन्हा खाली आले. विमानाच्या वेगातही मोठी चढ-उतार झाली. सर्वात तीव्र अवस्थेत विमान सुमारे 544 फूट प्रति सेकंद या वेगाने खाली जात होते. या परिस्थितीमुळे विमानातील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. काही वेळाने विमानाकडून आपत्कालीन स्थिती दर्शवणारा 7700 आणि त्यानंतर अनधिकृत हस्तक्षेप दर्शवणारा 7500 स्क्वॉक कोड प्रसारित करण्यात आला.

Continues below advertisement

दरम्यान, जखमी कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत गंभीर परिस्थितीतही कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवलं. त्यावेळी काही प्रवासी आणि क्रू सदस्य कॉकपिटमध्ये धावले आणि त्यांनी सहवैमानिकाला नियंत्रणापासून दूर केलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काही प्रवाशांनी सहवैमानिकाला पकडून बांधून ठेवलं. एका प्रवाशाने विमानावरील नियंत्रण स्थिर करण्यास मदत केली, तर विमानातच उपस्थित असलेल्या फ्लायदुबईच्या दोन अतिरिक्त वैमानिकांनी नंतर कॉकपिटचा ताबा घेतला. त्यानंतर विमानाला सौदी अरेबियातील तबूक विमानतळाकडे वळवण्यात आलं. सुमारे एका तासाहून अधिक काळाच्या या आपत्कालीन परिस्थितीनंतर FZ1073 विमानाने तबूक विमानतळावर सुरक्षित लँडिंग केलं. कॅप्टन आणि सहवैमानिक दोघांनाही दुखापत झाली होती आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रवाशांनाही वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने तेल अवीवला पोहोचवण्यात आलं. या घटनेनंतर विमानातील प्रवाशांनी कॉकपिटमध्ये धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती समोर आली असून, या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सदर घटनेतील भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी 2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी रुग्णालयातून व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. मच्छार यांनी सांगितलं की, ते जखमी अवस्थेत खाली पडले होते आणि विमान खाली जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या क्षणी विमानातील प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक असल्याचं जाणवल्याने त्यांनी पुन्हा प्रयत्न करून कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवाशांना आत येण्याची संधी मिळाली. सहवैमानिकाने हा हल्ला नेमका का केला, त्यामागे वैयक्तिक कारण होतं की अन्य कोणता हेतू होता, याबाबत अद्याप अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सहवैमानिकाच्या संभाव्य कट्टरतावादी विचारसरणीबाबत काही दावे केले आहेत; मात्र हे दावे तपासाचा अंतिम निष्कर्ष नाहीत. UAEच्या अॅटर्नी जनरलने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, घटनेची कारणं, परिस्थिती, हेतू, पूर्वनियोजन होतं का आणि दहशतवादी संबंध आहेत का, याचा तपास केला जात आहे. फ्लायदुबईनेही अधिकृत तपास सुरू असल्याचे सांगत या टप्प्यावर कोणत्याही निष्कर्षावर घाई करू नये, असे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे विमानाच्या कॉकपिट सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. विमानातील अतिरिक्त वैमानिकांची उपस्थिती आणि प्रवाशांनी केलेला हस्तक्षेप यामुळे विमान सुरक्षितपणे उतरवता आलं. मात्र, अशा प्रकारची घटना कशी घडली आणि संबंधित वैमानिकाची पूर्व तपासणी करताना ही बाब का समोर आली नाही, याचाही तपास होणार आहे. UAEच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू असून सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनीही प्राथमिक तपास केला आहे. त्यामुळे FZ1073 प्रकरणातील हल्ल्याचा नेमका हेतू आणि घटनाक्रम अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधिता बातमी:

Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..