Dubai Expats moving to London: जगातील श्रीमंतांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या दुबईवर सध्या भयंकर युद्धाची सावली आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आखाती देशांमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी, दुबईतील आलिशान व्हिला आणि पेंटहाऊसमध्ये राहणारे पाश्चात्य नागरिक, विशेषतः ब्रिटिश अब्जाधीश आता तिथून काढता पाय घेत आहेत. या 'स्थलांतरा'मुळे सध्या लंडनच्या रिअल इस्टेट मार्केटला अचानक सुगीचे दिवस आले आहेत.
दुबईला 'इराणी चटके' का बसत आहेत?
दुबई हे जरी जागतिक व्यापाराचे केंद्र असले तरी भौगोलिकदृष्ट्या ते इराणच्या अगदी जवळ आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील थेट संघर्ष आणि इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे दुबईतील सुरक्षिततेची खात्री आता श्रीमंतांना मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे जर युद्ध भडकले, तर दुबईतील विमानतळ आणि सागरी मार्ग विस्कळीत होण्याची भीती आहे. त्यामुळे सुरक्षित भविष्यासाठी अनेक श्रीमंत ब्रिटिश कुटुंबांनी आपला मुक्काम दुबईतून हलवून पुन्हा लंडनकडे वळवला आहे.
लंडनमध्ये घरांसाठी रांगा आणि अफाट भाडे
दुबईतून पळणारे हे श्रीमंत प्रवासी लंडनच्या पॉश भागांत (उदा. मेफेअर, नाइट्सब्रिज) घरांचा शोध घेत आहेत. मागणी अचानक वाढल्याने लंडनमध्ये घरांच्या भाड्याने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. लंडनच्या पॉश भागात एका आठवड्याचे भाडे 3 ते 4 लाख रुपये मोजायला हे गर्भश्रीमंत तयार आहेत. अनेक नागरिक तर इतके घाईत आहेत की, घराची पाहणी न करता केवळ फोटो पाहून एका आठवड्यात शिफ्ट होत आहेत.
लंडन का ठरतेय पहिली पसंती?
कर (Tax) जास्त असूनही लंडन हे जगातील सर्वात स्थिर आणि सुरक्षित शहर मानले जाते. युद्धाच्या काळात सोन्यापेक्षाही लंडनसारख्या शहरातील मालमत्तेला (Real Estate) जास्त किंमत मिळते.दुबईत राहणारे हजारो ब्रिटिश नागरिक आपल्या मूळ देशात परतणे अधिक सुरक्षित मानत आहेत. दुबईतून भांडवल बाहेर जाणे (Capital Outflow) आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. लंडनच्या वाढत्या भाड्यामुळे तिथे राहणाऱ्या मध्यमवर्गीयांची कोंडी होत आहे.
इराणकडून दुबईवर किती हल्ले झाले? (Missiles & Drones)
दुसरीकडे, फेब्रुवारी 2026 च्या अखेरीस सुरू झालेल्या या संघर्षात इराणने थेट युएईला लक्ष्य केलं आहे. आतापर्यंत सुमारे 285 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, 15 क्रूझ क्षेपणास्त्रे आणि 1567 हून अधिक ड्रोन डागण्यात आले आहेत. युएईच्या प्रगत संरक्षण यंत्रणेने (Air Defence) यातील बहुतांश हल्ले निकामी केले आहेत. मात्र, तरीही काही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे जमिनीवर पडल्याने नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशच्या नागरिकांचा समावेश आहे. जवळपास 141 लोक जखमी झाले असून, त्यात भारत, युएई आणि इतर 28 देशांतील नागरिकांचा समावेश आहे.
विमानतळ आणि एअरलाईन्सची स्थिती (Aviation Status)
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (DXB/DWC) आणि अल मकतूम विमानतळ सध्या 'मर्यादित क्षमतेने' चालवले जात आहेत. 1 मार्च रोजी दुबई विमानतळाच्या एका भागावर किरकोळ हल्ला झाल्यामुळे तिथे 4 कर्मचारी जखमी झाले होते, त्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारतातून एअर इंडिया आणि इंडिगोने दुबई आणि अबू धाबीला जाणारी अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. आज 15 मार्च रोजी इंडिगोने 97 उड्डाणे रद्द केली, तर एअर इंडियाने 4 हून अधिक उड्डाणे स्थगित केली आहेत. एतिहाद (Etihad) आणि एमिरेट्स (Emirates) देखील सध्या केवळ 'कन्फर्म तिकीट' असलेल्या प्रवाशांनाच विमानतळावर येण्याचे आवाहन करत आहेत.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती
युएईमधील स्थानिकांमध्ये अमेरिका आणि इस्रायलविरोधात सुप्त राग दिसून येत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, "हे आमचे युद्ध नाही", तरीही अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे आम्हाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत.दुबई आणि अबु धाबीमध्ये शाळा ऑनलाईन झाल्या असून वर्क-फ्रॉम-होम सुरू झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती असल्याने लोकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
