Donald Trump War with Iran: इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर झाला आहे.इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत ट्रम्प यांचे अधिकार रोखण्यासाठी (rein in Trump's war powers) अमेरिकन सिनेटमध्ये मांडण्यात आलेला ठराव 47 विरुद्ध 52 मतांनी नामंजूर झाला. हा ट्रम्प यांच्या परदेशातील लष्करी मोहिमांवर नियंत्रण आणू पाहणाऱ्या गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

Continues below advertisement

संविधानाचे उल्लंघन झाल्याचा आरोप

या ठरावाच्या समर्थकांचे आणि सिनेटर टिम केन यांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेच्या (Congress) परवानगीशिवाय इस्रायलसोबत मिळून हे युद्ध पुकारून संविधानाचे थेट उल्लंघन केले आहे. अमेरिकेच्या संविधानातील 'कलम २' नुसार, राष्ट्राध्यक्ष केवळ 'तात्काळ आणि थेट धोका' (imminent threat) असल्यासच स्वसंरक्षणार्थ हल्ला करू शकतात. मात्र, इराणकडून असा कोणताही तात्काळ धोका असल्याचा कोणताही पुरावा ट्रम्प प्रशासनाला देता आलेला नाही, असा आरोप केन यांनी केला आहे.

ट्रम्प प्रशासनाचे युद्धावरील दावे

या लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराण आपला अणू कार्यक्रम पुन्हा उभारत होता (जो गेल्या वर्षीच्या हल्ल्यात नष्ट झाला होता) आणि अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करत होता. तसेच, इराण इस्रायलवर तत्काळ हल्ला करण्याच्या तयारीत होता, असाही दावा ट्रम्प यांनी केला. इराणच्या 1979 पासूनच्या सर्व लष्करी आणि अणू हालचाली अमेरिकेसाठी एक 'तत्काळ धोका' असल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनाने केला आहे.

Continues below advertisement

रिपब्लिकन नेत्यांचा भक्कम पाठिंबा

सिनेटर जेम्स रिश यांच्यासह अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्प यांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. रिश यांच्या मते, अमेरिकेचे संरक्षण करणे हा राष्ट्राध्यक्षांचा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही आहे. गेल्या वर्षी इस्रायलच्या नेतृत्वाखाली झालेल्या '12 दिवसांच्या युद्धात' इराणचा अणू कार्यक्रम उद्ध्वस्त झाला होता, पण इराणने तो पुन्हा सुरू करण्याचा आणि क्षेपणास्त्रे बनवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ट्रम्प यांनी हा हल्ला करण्याचे आदेश दिले. इराणसोबत अणू कार्यक्रमावर सुरू असलेल्या चर्चेला रिश यांनी केवळ 'वेळकाढूपणा' म्हटले आहे.

युद्ध किती काळ चालणार?

पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले आहे की ही लष्करी कारवाई 'नुकतीच सुरू झाली असून' आणखी अमेरिकन सैन्य आणि साधनसामग्री या प्रदेशात पाठवली जात आहे. ट्रम्प यांनी हा संघर्ष 4 ते 5 आठवडे चालेल असा अंदाज वर्तवला आहे. रिपब्लिकन नेत्यांनीही दावा केला आहे की हे कोणतेही 'न संपणारे युद्ध' नसून ते अत्यंत वेगाने संपेल.

ठरावाचे आणि मतदानाचे महत्त्व

जरी हा ठराव मंजूर झाला असता, तरीही ट्रम्प यांनी 'नकाराधिकार' (Veto) वापरून तो फेटाळला असता. तरीही, अशा प्रकारच्या ठरावांमुळे अमेरिकन जनतेला आपल्या प्रतिनिधींची युद्धाबाबतची भूमिका समजण्यास मदत होते आणि निवडणुकीच्या वर्षात याचे मोठे राजकीय परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इतर महत्वाच्या बातम्या