(Source: Poll of Polls)
Donald Trump : भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, भारत सरकारची पहिली प्रतिक्रिया समोर...
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा भारत रशियाकडून खनिज तेल खरेदी करत असल्यानं नाराजी व्यक्त केली होती. भारतावर अतिरिक्त टॅरिफ देखील त्यांनी लादलं आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा दावा केला आहे. हा दावा भारतासंदर्भातील आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांचे मित्र नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करेल. ट्रम्प यांनी हे यूक्रेन युद्ध समाप्त करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल असल्याचं म्हटलंय. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसनं नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी घाबरले असल्याचं म्हटलं. दुसरीकडे ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारत सरकारनं स्पष्टपणे म्हटलं की ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.
ट्रम्प यांनी बुधवारी ओवलमध्ये पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं की भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय यामुळं अमेरिका खूश नव्हती. भारतानं रशियाकडून तेल खरेदी केल्यानं व्लादीमीर पुतिन यांना युद्धासाठी आर्थिक मदत मिळते. ट्रम्प यांनी म्हटलं ते (मोदी) माझे मित्र आहेत, आमच्यामध्ये चांगले संबंध आहेत. आ्ही खूश नव्हतो कारण ते रशियाकडून तेल खरेदी करत होते.रशियाला यूक्रेन युद्ध सुरु करण्यास मदत मिळते, ज्यामुळं 15 लाख लोकांचा मृत्यू झाला.
डोनाल्ड ट्रम्प पुढं म्हणाले की. भारत तेल खरेदी करत होता, त्यामुळं मी खुश नव्हतो आणि (मोदी) यांनी मला आश्वासन दिलं आहे की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत.हे एक मोठं पाऊल आहे. आता आम्हाला चीनला देखील असंच करण्यासाठी तयार करावं लागेल. सीआरईएच्या नुसार चीन आणि भारत रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करतात.
विदेश मंत्रालयानं काय म्हटलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारची सर्वोच्च प्राथमिकता ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं आहे. रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीबाबतच्या प्रश्नावर जयस्वाल यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं की भारत तेल आणि गॅसचा महत्त्वाचा आयातदार देश आहे. अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं आमची प्राथमिकता आहे.जोपर्यंत अमेरिकेचा प्रश्न आहे, आम्ही काही वर्षांपासून आमच्या ऊर्जा खरेदीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत गेल्या दशकापासून सातत्यानं प्रगती केली आहे.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांनी महान व्यक्ती म्हटलं. ट्रम्प म्हणाले की ते ट्रम्प यांच्यावर प्रेम करतात, मात्र, मला वाटत की तुम्ही प्रेम या शब्दाचा चुकीचा अर्थ लावावा, त्यांच्या राजकीय करिअरला नुकसान पोहोचवायचं नाही.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं की नरेंद्र मोदी ट्रम्प यांना घाबरले आहेत. ट्रम्प यांना भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत याची परवानगी देतात.अनेकदा दुर्लक्ष करुन देखील शुभेच्छा संदेश पाठवतात. अर्थमंत्र्यांनी अमेरिकेचा दौरा रद्द केला. शर्म अल शेख मध्ये सहभागी झाले नाहीत. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांच्या दाव्याचं खंडन देखील करत नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा खनिज तेल आयातदार देश आहे.




















