वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना भारत आणि चीनवर मोठा आरोप केला आहे. भारत आणि चीन यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धासाठी रशियाला फंडिंग करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत आणि चीनवर आरोप (Donald Trump Allegations on China and India)
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावलं आहे. ज्यामुळं अमेरिकेनं भारतावर लादलेलं एकूण टॅरिफ 50 टक्के झालं असून ते जगात सर्वाधिक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या सत्रात आमसभेला संबोधित केलं. यामध्ये ते म्हणाले चीन आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करत या युद्धाला अर्थसहाय्य करणारे मुख्य देश झाले आहेत.
भारतानं अमेरिकेनं लादलं टॅरिफ अयोग्य आणि अन्यायकारक असल्याचं सांगितलं आहे. भारतानं म्हटलं की कोणतीही मोठी अर्थव्यवस्था आपल्या राष्ट्रीय आणि आर्थिक हितांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते मार्ग वापरेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीमध्ये दुसऱ्या कार्यकाळातील आठ महिने सर्वात यशस्वी असल्याचं सांगितलं. अमेरिकेचं सुवर्णयुग असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय संयुक्त राष्ट्र संघटनेकडून विदेश धोरणात मदत होत नसल्यानं त्यांच्यावर टीका देखील ट्रम्प यांनी केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं. यापूर्वी त्यांनी 2020 मध्ये संबोधित केलं. इराण युद्धाचा उल्लेख करत ट्रम्प यांनी म्हटलं की आम्ही ऑपरेशन मिडनाइट हॅमर राबवत इराणच्या अणवस्त्रांना उद्धवस्त केलं. कोणत्याही देशाकडे धोकादायक अणवस्त्र असू नयेत. ट्रम्प पुढं म्हणाले की आम्ही जे केलं ते इतर कोणीच करु शकलं नसतं.
संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सात युद्ध रोखल्याचा दावा केला. यामध्ये त्यांनी भारत- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा केला. इस्त्रायल- इराण युद्ध यासह एकूण 7 युद्ध थांबवल्याचं ट्रम्प म्हणाले. हे काम संयुक्त राष्ट्रानं करायला हवं होतं. मात्र ते मला करायला लागलं, असं ट्रम्प म्हणाले. नाटो देशांकडून स्वत: विरोधात युद्धाला फंडिंग केलं जात आहे. नाटो देशांनी रशियन ऊर्जा आणि रशियन ऊर्जा उत्पादनांवर बंदी घातली नाही, हे लज्जास्पद आहे. रशिया विरुद्ध लढून त्यांच्याकडूनच तेल आणि गॅस खरेदी करणं लज्जास्पद आहे. जर, युद्ध समाप्त करण्यासाठी कोणताही समझोता झाला नाही तर अमेरिका रशियावर टॅरिफ लावण्यासाठी तयार आहे, असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला. मात्र, हे टॅरिफ प्रभावी होण्यासाठी यूरोपियन देशांना अकत्र यावं लागेल, असं ट्रम्प म्हणाले.