न्यूयॉर्क : G-20 शिखर परिषद नुकतीच दक्षिण आफ्रिकेत पार पडली होती. या परिषेत अमेरिकेनं सहभाग घेतला नव्हता. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासंदर्भातील कारण जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेला निमंत्रण देणार नसल्याचं देखील जाहीर केलं. ट्रम्प यांनी अमेरिकेकडून दक्षिण आफ्रिकेला दिली जाणारी अनुदानं बंद करण्याची घोषणा देखील केली आहे.
अमेरिकेनं नुकत्याच दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जी 20 शिखर परिषदेत सहभाग घेतला नव्हता.ट्रम्प प्रशासनाकडून असा दावा करण्यात आला की दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं त्यांच्या देशात होणाऱ्या ख्रिश्चनांच्या हत्यांबाबत मौन धारण केलं आहे. दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळं पुढील वर्षी अमेरिकेमधील फ्लोरिडामध्ये होणाऱ्या जी 20 परिषदेचं आमंत्रण दक्षिण आफ्रिकेला दिलं जाणार नाही. याशिवाय अमेरिकेकडून दक्षिण आफ्रिकेला जे अनुदान मिळायचं ते देखील बंद केलं जाणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पोस्ट शेअर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबत माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिकेनं दक्षिण आफ्रिकेतील जी 20 शिखर परिषदेत सहभाग घेतला नाही याचं कारण दक्षिण आफ्रिकेचं सरकार अफ्रिकानर्स, डच, फ्रेंच आणि जर्मन वंशांच्या लोकांबाबत होत असलेल्या भीषण मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा स्वीकार करत नाही किंवा त्याच्यावर काय कार्यवाही करत नाही. स्पष्ट शब्दात सांगायचं तर तिथं गौरवर्णीयांच्या हत्या केल्या जात आहेत. त्यांची जमीन आणि शेती हिसकावून घेतली जात आहे.
ट्रम्प यांनी यानंतर अमेरिकेतील वृत्तसंस्थांवर देखील टीका केली. ते म्हणाले की सर्वात वाईट हे आहे की लवकर बंद होणार असलेल्या न्यूयॉर्क टाइम्स आणि तथाकथित फेक न्यूज मीडिया या कथित नरसंहाराविरोधात एकही शब्द बोलत नाही. याचं कारण कट्टर डाव्या मीडियाचं असत्य आणि ढोंग बंद होत आहे.
आफ्रिकेचं अनुदान थांबवणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमधून दक्षिण आफ्रिकेवर सडकून टीका केली आहे. दक्षिण आफ्रिकेनं ते कोणत्याही ठिकाणी महत्त्वाचं सदस्यत्व मिळवू शकत नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं आहे. आम्ही त्यांना मिळणारी सर्व अनुदानं थांबवत आहोत, ते देखील तात्काळ असं ट्रम्प यांनी म्हटलंय.