वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायल संघर्षाबाबात मोठं वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधी जाहीर केली होती. आता ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचा भंग करणाऱ्या इराण आणि इस्त्रायलवर नाराजी व्यक्त केली आहे. नाटो शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी निघण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी इस्त्रायलच्या भूमिकेवर नाराज असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इस्त्रायलनं मोठे हल्ले करायला नको होते, असं ट्रम्प म्हणाले.  

डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलला इशारा देताना म्हटलं की तुम्ही आता इराणवर बॉम्ब टाकू नका, अन्यथा हे शस्त्रसंधीचं उल्लंघन असेल. एकीकडे इस्त्रायलकडून इराणनं शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप केला असून इस्त्रायलच्या भूमीवर हल्ले केल्याचा दावा केला जात असतानाच ट्रम्प यांचं वक्तव्य आलं आहे. ट्रम्प म्हणाले की जर इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं असलं तरी इस्त्रायलनं देखील शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. मी इस्त्रायलवर खुश नाही, असं म्हटलं.  

इस्त्रायलनं आता बॉम्ब टाकू नये

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल पोस्ट करत म्हटलं की "इस्त्रायलनं आता बॉम्ब टाकू नये, तुम्ही जर असं करत असाल तर शस्त्रसंधीचं उल्लंघन ठरेल. तुमच्या पायलटना घरी माघारी बोलवा, असं ट्रम्प म्हणाले. इस्त्रायलनं शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्यानंतर पुन्हा हल्ला केला हे मला आवडलेलं नाही. यापूर्वी इस्त्रायलच्या सरकारनं म्हटलं होतं की इराणसोबत युद्ध करण्याचा हेतू पूर्ण झाला होता. इस्त्रायलनं इराणचा अणवस्त्र कार्यक्रम आणि बॅलेस्टिक मिसाईलच्या संकटाला नामशेष केल्यानंतर अमेरिकेकडून प्रस्तावित शस्त्रसंधीवर सहमती केल्याचं म्हटलं होतं.  

शस्त्रसंधीची सकाळी घोषणा

पश्चिम आशियातील दोन देशांमध्ये सुरु असलेला संघर्ष तब्बल 12 दिवसानंतर संपला. इस्त्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मात्र, शस्त्रसंधी झाल्यानंतर इस्त्रायलमध्ये स्फोटांचे आवाज आणि सायरनचे आवाज ऐकू येत होते. इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्रायल काटज यांनी मिसाईल हल्ले करुन इराणकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचं म्हटलं. त्यानंतर इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी तेहरानवरील हल्ले आणि त्यांच्या सरकारवरील हल्ले पुन्हा सुरु करण्याच्या सैन्याला आदेश दिले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराण आणि इस्त्रायल दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरु ठेवल्यानं नाराजी व्यक्त केली आहे.