नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळात आक्रमक भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत वोटिंग मशीनद्वारे राबवली जाणारी मतदान प्रक्रिया लवकरच बंद करणार असल्याचं म्हटलं. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन ही घोषणा केली आहे. याशिवाय अमेरिकेत होणाऱ्या ईमेल मतदानाचा विरोध देखील त्यांनी केला आहे. यावर देखील बंदी घालण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की लवकरच ते एक कार्यकारी आदेश देणार आहेत. त्यानंतर 2026 मध्ये मध्यावधी निवडणुकीत वोटिंग मशीन आणि ई-मेलद्वारे मतदानावर बंदी आणली जाईल. ट्रम्प यांनी दीर्घकाळापासून वोटिंग मशीनद्वारे मतदान आणि ईमेल मतदानाचा विरोध केला आहे. वोटिंग मशीन हॅक होऊ शकतात यामुळं निवडणुकीत फेरफार केला जाऊ शकतो, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आहे.त्या पोस्टनुसार ट्रम्प यांनी वोटिंग मशीनद्वारे होणाऱ्या मतदानात गडबड होऊ शकते, अशी शंका व्यक्त केली आहे. मात्र, आतापर्यंत अमेरिकेच्या निवडणुकीत असा कोणताही प्रकार समोर आलेला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांकडून ईमेलद्वारे मतदानाचं समर्थन केलं जातं. त्यांच्या मते ईमेलद्वारे मतदानामुळं जे लोक सामान्य प्रक्रियेद्वारे मतदान करु शकत नाहीत त्यांना मतदानाची संधी प्राप्त होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश असतो.
डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षांचे नेते ईमेल वोटिंगद्वारे होणाऱ्या मतदानात फेरफार होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते वोटिंग मशीन हॅक केलं जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की मी एक अभियान सुरु करणार आहे ज्यामध्ये मेल इन बॅलेट आणि पूर्णपणे चुकीची, महाग आणि गांभीर्यानं वादग्रस्त अशा वोटींग मशीन पासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. ट्रम्प यांनी पुढं म्हटलं की वोटिंग मशीन वॉटरमार्क पेपरच्या तुलनेत 10 पट महाग असतात. पेपरवर होणारं मतदान वेगवान आणि कोणत्याही संशयाशिवाय असतं. मतपत्रिकेद्वारे कोणत्याही वादाशिवाय निवडणूक पार पडते आणि निकाल स्पष्ट असतो, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं हे टॅरिफ वाढवण्यात आलं आहे. दुसरीकडे रशिया यूक्रेन युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांनी अलास्का येथे व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.