Pope Leo on Donald Trump: कॅथलिक धर्मगुरु पोप लिओ (Pope Leo) आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोप लिओ यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना "गुन्हेगारीबाबत कमकुवत आणि परराष्ट्र धोरणात अतिशय वाईट" म्हटले. ट्रम्प यांच्या टीकेनंतर पोप लिओ यांनी स्पष्ट केले आहे की, आपल्याला ट्रम्प प्रशासनाची 'कोणतीही भीती वाटत नाही' आणि ते या वादात न पडता जगाला शांततेचा संदेश देत राहतील, असे ठणकावलं.

इराण युद्धावरून तीव्र मतभेद

पोप लिओ हे इराण युद्धाचे खंदे विरोधक असून त्यांनी ट्रम्प यांच्या 'इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याच्या' धमकीला "अस्वीकार्य" म्हटले होते. ट्रम्प यांनी असा आरोप केला आहे की पोप हे "अण्वस्त्रांबाबत मवाळ" आहेत आणि अण्वस्त्रे मिळवू पाहणाऱ्या (इराणसारख्या) देशांना रोखण्यावर त्यांचा विश्वास नाही.

ट्रम्प यांचे वादग्रस्त दावे

ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, पोप लिओ यांची निवड ते अमेरिकन असल्यामुळेच झाली. एवढेच नाही तर, "जर मी व्हाईट हाऊसमध्ये नसतो, तर लिओ व्हॅटिकनमध्ये नसते," असे खळबळजनक वक्तव्य ट्रम्प यांनी केले. 

स्थलांतरितांच्या मुद्यावर पोप यांची टीका

पोप यांनी ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणावरही टीका केली आहे. स्थलांतरितांना अमानवीय वागणूक देणारा व्यक्ती स्वतःला गर्भापाताला विरोध करणारा "प्रो-लाईफ" समर्थक कसा म्हणवून घेऊ शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

हिटलर आणि मुसोलिनी यांचा संदर्भ

ट्रम्प यांच्या या टीकेवर जगभरातील कॅथोलिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका तज्ज्ञाने नमूद केले आहे की, दुसऱ्या महायुद्धात हिटलर किंवा मुसोलिनी यांनीही कोणत्याही पोपवर इतक्या थेट आणि जाहीरपणे हल्ला केला नव्हता. 

इराण आणि अमेरिका शांतता चर्चा निष्फळ

दरम्यान, मागील चर्चेतील 15 दिवसांच्या युद्धबंदीनंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता वाटाघाटी अयशस्वी ठरल्या आहेत.या वाटाघाटी फिस्कटल्यामुळे जागतिक ऊर्जा संकट वाढण्याची भीती असून कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलर्सवर गेले आहेत.अमेरिकेचे सैन्य आता इराणच्या बंदरांची लष्करी नाकेबंदी करणार आहे. मात्र, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी स्पष्ट केले आहे की ब्रिटन ट्रम्प यांच्या या नाकेबंदीत सहभागी होणार नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या