Donald Trump on Iran: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे लष्कर, पोलीस आणि 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) च्या जवानांना शस्त्रे खाली ठेवण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या सुरक्षा दलांनी सध्याच्या राजवटीची साथ सोडल्यास त्यांना "संपूर्ण अभय" आणि संरक्षणाची हमी ट्रम्प यांनी दिली आहे ते म्हणाले की, शरण आल्यास तुम्हाला संपूर्ण अभयासह पूर्णपणे सुरक्षित ठेवले जाईल, अन्यथा तुम्हाला निश्चित मृत्यूला सामोरे जावे लागेल. कतार, सौदी अरेबिया आणि यूएईसह संपूर्ण मध्यपूर्वेला लक्ष्य करण्यासाठी आपली क्षेपणास्त्रे रोखली होती, परंतु अमेरिकेने येऊन त्यांचे हे मनसुबे उधळून लावले, असेही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

जनतेची साथ देण्याची साद

ट्रम्प यांनी इराणच्या सुरक्षा दलांना सांगितले की, इराणी जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची आणि तुमचा देश परत मिळवण्यासाठी मदत करण्याची हीच योग्य वेळ आहे. जगभरातील इराणी राजनैतिक अधिकाऱ्यांनी इतर देशांकडे आश्रय मागावा आणि एका 'नव्या व अधिक चांगल्या इराणची' निर्मिती करण्यासाठी अमेरिकेला मदत करावी, असेही ट्रम्प म्हणाले. 

इराणच्या मोठ्या लष्करी नुकसानीचा दावा

ट्रम्प यांनी दावा केला की युद्धात इराणने 'सर्व काही गमावलं आहे. अवघ्या तीन दिवसांत इराणची विमानभेदी शस्त्रे, हवाई दल आणि हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे संपली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. तसेच, इराणची 60 टक्के क्षेपणास्त्रे, 64 टक्के लाँचर्स आणि नौदलाची 24 जहाजे नष्ट झाली असून त्यांचे नौदल संपले आहे, असा मोठा दावा त्यांनी केला. इराणची ताकद आधीच संपुष्टात आल्यामुळे इराणच्या जमिनीवर थेट अमेरिकन सैन्य उतरवण्याचा आपला सध्या कोणताही विचार नाही, आणि तसे करणे हा केवळ वेळेचा अपव्यय ठरेल असे ट्रम्प म्हणाले.

Continues below advertisement

पुढील नेता निवडण्यात अमेरिकेचा सहभाग

सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचा पुढील नेता निवडण्याच्या प्रक्रियेत अमेरिका सहभागी होईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. असा नेता निवडला जावा जो लोकांसाठी आणि देशासाठी चांगला असेल तसेच इराणमध्ये शांतता व सलोखा आणेल, असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी अली खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांना इराणचा पुढील नेता म्हणून विरोध केला. 

इतर महत्वाच्या बातम्या