मुंबई : आपल्या हेकेखोरीसाठी प्रसिद्ध असलेले आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Peace Prize) इतके उतावीळ झालेत की त्यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन केल्याचं समोर आलं. नॉर्वेतील प्रसिद्ध वृत्तसंस्था Dagens Næringsliv ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अचानक नॉर्वेचे अर्थमंत्री जेंस स्टोल्टेनबर्ग यांना फोन करून (Nobel nomination) बद्दल चौकशी केली.
नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा (trade relations) करण्यासाठी फोन केला असल्याचं सांगण्यात येतंय. पण खरा उद्देश हा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळावं यासाठीच ट्रम्प यांनी हा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. व्हाइट हाऊसनेदेखील या आधी डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा अशी मागणी केली आहे.
ओबामांना पुरस्कार दिला, मग आपल्याला का नाही?
ट्रम्प यांनी याआधी अनेकदा नोबेल पुरस्कारासंबंधी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बराक ओबामा यांच्यासह चार माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला का हा पुरस्कार दिला जात नाही असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प विचारतात.
बराक ओबामा यांनी काहीही केलं नसताना, कोणतेही महत्त्वाचे युद्ध थांबवले नसताना त्यांना शांततेचा नोबेल दिला, मग आपल्याला का दिला जात नाही असा नाराजीचा सूर ट्रम्प यांनी अनेकदा व्यक्त केला आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा
जून महिन्यात या संबंधी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर, Truth Social वर लिहिताना म्हटले होते की, “मी भारत-पाकिस्तानमधील युद्ध रोखले, सर्बिया-कोसोवोमध्ये शांतता प्रस्थापित केली, इजिप्त-इथिओपियामधील संघर्ष रोखला, आणि अनेक करार केले. तरीही मला शांततेचा नोबेल मिळणार नाही. पण लोकांना सत्य माहिती आहे आणि तेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.”
इस्त्रायल आणि पाकिस्तानचा पाठिंबा
भारत-पाकिस्तान या अणवस्त्रधारी देशांमधील संभाव्य युद्ध थांबवले, तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत सहा मोठी युद्धे थांबवली, शांतता करार केले असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांची सगळी उठाठेव ही शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी आहे हे काही लपून राहिलं नाही. इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा अशी शिफारस केली आहे. तसेच ट्रम्प यांच्या कळपात शिरल्याने अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या पाकिस्ताननेही डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा अशी मागणी केली आहे.
ऑक्टोबरमध्ये शांततेच्या नोबेलची घोषणा
नोबेलच्या शांतता पुरस्काराची घोषणा ही नॉर्वोची राजधानी ऑस्लो या ठिकाणी केली जाते. हा पुरस्कार कुणाला द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी नॉर्वेच्या संसदेकडून एक समिती (Norwegian Nobel Committee) तयार केली जाते. दरवर्षी ही नोबेल समिती शेकडो उमेदवारांमधून शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते निवडते. या पुरस्काराच्या विजेत्याची घोषणा ऑक्टोबर महिन्यात केली जाते.
ही बातमी वाचा: