Donald Trump call to Narendra Modi US Iran War: अमेरिका आणि इराणमध्ये (US Iran War) चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यनंतर आता दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी 16 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं बातमी मिळतेय. चर्चेची दुसरी फेरी ही इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये होण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची मुदत संपण्याआधी पुन्हा चर्चेची शक्यता आहे. पाकिस्तान, तुर्कीए, इजिप्त चर्चेसाठी मध्यस्थी करत आहेत. चर्चा पुन्हा सुरू करण्याचा संयुक्त राष्ट्रांचाही आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. 

इराण आणि अमेरिकेच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत फोनवर संवाध साधला. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची जवळपास 40 मिनिटं फोनवरुन चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातील सद्यस्थितीच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला होता, असं नरेंद्र मोदी म्हणाले. (Donald Trump call to Narendra Modi)

ट्रम्प मोदींना फोनवर काय काय म्हणाले? (Donald Trump And Narendra Modi)

नरेंद्र मोदी म्हणाले की, माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मला फोन आला. विविध क्षेत्रांमध्ये आमच्या द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आम्ही आढावा घेतला. सर्वच क्षेत्रांमध्ये आमची सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केली आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) खुला व सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. 

अमेरिकन लष्कराने इराणच्या बंदरांची नाकेबंदी- (Strait of Hormuz)

अमेरिकन लष्कराने इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू केल्यामुळे, जागतिक बाजारपेठेतून दररोज सुमारे 20 लाख बॅरल्स (दोन दशलक्ष बॅरल्स) इराणी तेल कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे जागतिक पुरवठ्यावर ताण येईल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांचा इशारा- (Donald Trump Iran vs US War)

गेल्या एका महिन्याच्या कालावधीत, भारताने या मार्गावरून आठहून अधिक LPG टँकर्सना सुरक्षितपणे मार्गस्थ केले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी घोषणा केली आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गस्थ होणाऱ्या कोणत्याही जहाजाने इराणला शुल्क (टोल) भरण्यास अमेरिका परवानगी देणार नाही. जरी भारताने आपल्या LPG जहाजांसाठी अलीकडच्या काळात कोणतेही शुल्क भरले नसले, तरीही भविष्यातील परिस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील इस्लामाबाद येथील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, वाटाघाटींच्या दुसऱ्या फेरीचा विचार केला जात आहे. परिणामी, सोमवारी (13 एप्रिल 2026) कच्च्या तेलाचे दर वाढून 107 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले. तथापि, संभाव्य वाटाघाटींच्या आशेमुळे मंगळवारी (14 एप्रिल 2026) हे दर पुन्हा घसरून 100 डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली आले.

संबंधित बातमी:

US Iran War : इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला