Donald Trump advisor Peter Navarro : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो (Peter Navarro) यांनी भारतावर पुन्हा टीका केली आहे. रशियन तेल खरेदी करून भारत अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला निधी पुरवतो, असा आरोप पीटर नवारो (Peter Navarro) केला आहे. तसेच ब्राह्मण समाज भारतीयांच्या कष्टावर नफा कमावत असल्याचाही दावा त्यांनी केला. ते एका मुलाखतीत बोलत होते.
“पाहा, नरेंद्र मोदी एक महान नेते आहेत. पण ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नेते असूनही पुतिन आणि शी जिनपिंगसोबत का हातमिळवणी करत आहेत? हे मला समजत नाही. मी फक्त भारतीय जनतेला एवढंच सांगेन, कृपया, इथे काय सुरू आहे ते समजून घ्या. ब्राह्मण भारतीयांच्या नुकसानीवर नफा कमावत आहेत. हे थांबायला हवं. आम्ही यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहोत,” असं नवारो यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं समर्थन करताना नवारो म्हणाले, “पुतिनने युक्रेनवर हल्ला करण्याआधी भारत रशियन तेल खरेदीच करत नव्हता. पण आता काय झालं? रशियन रिफायनरी सवलत देतात, भारत ते तेल शुद्ध करतो आणि युरोप, आफ्रिका, आशिया येथे महाग दराने विकतो. यातून रशियाची युद्धयंत्रणा चालते.”
अमेरिकन करदात्यांचा पैसा यामुळे अप्रत्यक्षपणे युक्रेनच्या संरक्षणावर खर्च होतोय असं पीटर नवारो सांगितलं. भारतावर लावण्यात आलेल्या टॅरीफवर बोलताना ते म्हणाले, “भारत हा टॅरीफचा महाराजा आहे. जगात सगळ्यात जास्त शुल्क भारत लावतो. आम्हाला विक्री करू देत नाही. मग त्याचा फटका कोणाला बसतो? अमेरिकन कामगारांना, अमेरिकन करदात्यांना, आणि रशियन ड्रोनखाली मरत असलेल्या युक्रेनियन लोकांना.”
भारत रशियासोबत व्यापार थांबवण्यास तयार नाही, यावर नवारोने अनेक वेळा हल्ला चढवला आहे. त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाला “मोदींचं युद्ध”, असं म्हटलं आहे आणि भारत नफ्यासाठी हे युद्ध चालवत असल्याचा आरोप केला आहे.
ट्रम्प प्रशासनाने याच महिन्यात भारतावर रशियन तेल खरेदीबाबत हल्ला नाराजी व्यक्त केली होती. नवारोने रशिया-युक्रेन संघर्षाला “मोदींचं युद्ध” म्हणत नवी दिल्लीला बीजिंग व मॉस्कोच्या जवळ जाण्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. “भारत, तू जगातील सर्वात मोठी लोकशाही आहेस, बरोबर? मग लोकशाहीप्रमाणे वाग... लोकशाहीसोबत उभा रहा... पण तू हुकूमशहांसोबत हातमिळवणी करतोस,” असं त्यांनी भारतावर 50% टॅरिफ लागू झाल्यानंतर काही तासांतच म्हटलं.
“युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाआधी, भारताच्या आयातीत रशियन तेलाचा हिस्सा 1% पेक्षा कमी होता. आज? 30% पेक्षा जास्त – दिवसाला 15 लाख बॅरल्स. ही वाढ भारतीय मागणीमुळे नाही, तर नफेखोरी करणाऱ्यांमुळे आहे. यात रक्त आणि विध्वंसाचं मूल्य दडलेलं आहे,” असा आरोप त्यांनी केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या