Donald trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनात प्रशासकीय फेरबदलांचे सत्र सुरू झाले असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आला आहे. 'द अटलांटिक'च्या वृत्तानुसार, आता एफबीआय (FBI) प्रमुख काश पटेल आणि नॅशनल इंटेलिजन्स प्रमुख तुलसी गबार्ड हे ट्रम्प यांच्या रडारवर असून त्यांची लवकरच हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Continues below advertisement

Kash Patel: काश पटेल यांच्यावर आरोप

भारतीय वंशाचे आणि ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे काश पटेल सध्या गंभीर आरोपांच्या विळख्यात आहेत. काश पटेल यांनी वैयक्तिक कामांसाठी, जसे की खेळ बघायला जाण्यासाठी, एफबीआयच्या सरकारी जेटचा वापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी आपली मैत्रीण ॲलेक्सिस विल्किन्स हिला 'SWAT' कमांडोची सुरक्षा पुरवण्यासाठी सरकारी संसाधनांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांच्या विरोधात तपास करणाऱ्या अनेक एफबीआय एजंटना त्यांनी पदावरून हटवले, ज्यावरून आता न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. 

माजी एफबीआय एजंट काइल सेराफिन यांच्या मते, ट्रम्प कोणत्याही क्षणी काश पटेल यांना पदावरून हटवू शकतात. तर अलीकडेच इराणशी संबंधित असलेल्या हॅकर्सनी काश पटेल यांच्या वैयक्तिक ईमेल खात्यात घुसखोरी केल्याचा दावा केला आहे. या हॅकर गटाने पटेल यांचे अनेक छायाचित्रे आणि कागदपत्रे इंटरनेटवर सार्वजनिक केल्याचेही म्हटले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागातील एका अधिकाऱ्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला असून, पटेल यांचे ईमेल खाते हॅक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Continues below advertisement

Tulsi Gabbard: तुलसी गबार्ड आणि ट्रम्प यांच्यात 'युद्ध' धोरणावरून मतभेद?

नॅशनल इंटेलिजन्स प्रमुख तुलसी गबार्ड यांच्या भूमिकेवरही ट्रम्प नाराज असल्याचे समजते. इराण युद्धावरून गबार्ड आणि ट्रम्प यांच्यात मतभेद उघड झाले आहेत. ट्रम्प यांनी इराणच्या युरेनियम क्षमतेवर हल्ल्याचे समर्थन केले असताना, गबार्ड यांनी सीनेटमध्ये सांगितले की, इराणने आपली अण्वस्त्र क्षमता पुन्हा विकसित केलेली नाही. ट्रम्प यांच्या इराण युद्धाच्या निषेधार्थ राजीनामा देणारे अधिकारी जो केंट यांची गबार्ड यांनी पाठराखण केली, जे ट्रम्प यांना रुचलेले नाही. यामुळे ट्रम्प यांनी खासगीत गबार्ड यांना बदलण्याबाबत वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केल्याचे वृत्त 'द गार्जियन'ने दिले आहे. त्यामुळे तुलसी गबार्ड यांचीही गच्छंती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Donald Trump: प्रशासकीय फेरबदलांचा सपाटा: कोण-कोण बाहेर?

ट्रम्प सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना घरी धाडले आहे:

पॅम बॉन्डी (अटॉर्नी जनरल): 'एपस्टीन फाइल्स' योग्यरित्या न हाताळल्याचा ठपका ठेवत त्यांना पदावरून हटवण्यात आले.

क्रिस्टी नोएम (होमलँड सिक्युरिटी): वादग्रस्त विधाने आणि कामाच्या पद्धतीमुळे त्यांची गच्छंती झाली.

रॅन्डी जॉर्ज (आर्मी चीफ): कार्यकाळ संपण्यापूर्वीच संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी रॅन्डी जॉर्ज यांना निवृत्त होण्याचे आदेश दिले. त्यांच्या जागी आता क्रिस्टोफर ला नेव कार्यवाहक प्रमुख असतील.

US-Israel vs Iran War: इराण युद्ध आणि घटती लोकप्रियता

सुरुवातीला ट्रम्प अधिकाऱ्यांना हटवण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, इराणसोबतच्या युद्धानंतर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे सरकारवर होत असलेली टीका थांबवण्यासाठी आणि प्रशासनावर आपली पकड मजबूत करण्यासाठी ट्रम्प आता 'क्लीनअप' मोहीम राबवत असल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा

Iran War Live Update: इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!