अवघ्या 24 तासांच्या अंतराने दक्षिण आशियातील दोन प्रमुख राजधानी शहरांवर भीषण स्फोटांनी दहशतीचे सावट आणले आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या दोन्ही शहरांतील हल्ल्यांनी केवळ स्थानिक सुरक्षेचा प्रश्न नव्हे, तर भूराजकीय अस्थिरतेचे गंभीर संकेत पुन्हा एकदा दिले आहेत.
दिल्लीतील हल्ला : लाल किल्ल्याजवळ स्फोट
सोमवारी 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाला. सिग्नलवर थांबलेल्या एका वाहनात अचानक झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या सहा गाड्या आणि तीन ऑटोरिक्षांना आग लागली. या स्फोटात किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी कायदा (UAPA) आणि स्फोटक पदार्थ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, स्फोट अपघाती नसून “पूर्वनियोजित आणि हेतुपूर्वक घडवलेली घटना” असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आत्मघाती स्फोट
या स्फोटानंतर अवघ्या एका दिवसात, 11 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील जिल्हा न्यायालयाबाहेर आत्मघाती हल्ला झाला. दुपारच्या सुमारास न्यायालयीन संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिस वाहनाजवळ हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. या हल्ल्यात किमान 12 जण ठार आणि 27 जखमी झाले. मृतांमध्ये अनेक पादचारी आणि न्यायालयीन कामासाठी आलेले नागरिक होते. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे पुष्टी केली.
तोपर्यंत दक्षिण आशियात शांतता येऊच शकत नाही
दरम्यान, या दोन्ही हल्ल्यानंतर पाकिस्तानी पत्रकारानं केलेल्या ट्विटनं भूवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी (Taha Siddiqui on India and Pakistan Blast) यांनी पाकिस्तानी लष्करावर गंभीर आरोप केला आहे. सिद्दीकी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गेल्या 24 तासांत दहशतवादाने दिल्ली आणि इस्लामाबाद दोन्ही शहरांना हादरवलं आहे. दोन्ही ठिकाणी आत्मघाती हल्लेखोरांनी स्फोट घडवले आणि पाकिस्तानी लष्कर ज्यांना आपली मालमत्ता म्हणते, तेच या हल्ल्यांमागे आहेत. जोपर्यंत पाकिस्तानी जनरल इस्लामी दहशतवादाचा वापर आपल्या देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणाच्या हत्यार म्हणून करत राहतील, तोपर्यंत दक्षिण आशियात शांतता येऊच शकत नाही! सिद्दीकी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगला
दुसरीकडे दिल्लीत झालेल्या हल्ल्यानंतर उत्तर प्रदेश आणि मुंबईत हाय अलर्ट देण्यात आला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरही कडेकोट तपासणी सुरु आहे. तिकडं पाकिस्तानात हल्ल्यानंतर कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारली नसली, तरी अशा प्रकारच्या हल्ल्यांमागे पाकिस्तान तालिबान (TTP) चा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पाकिस्तानने थेट भारत आणि अफगाणिस्तानवर आरोप करत हा भारत पुरस्कृत दहशतवादाचा नमुना असल्याचा आरोप केला. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या षड्यंत्रांचा जागतिक स्तरावर निषेध करण्याचे आवाहन केले. तथापि, त्यांच्या आरोपाला कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही.
पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला
इस्लामाबाद स्फोटानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान युद्धाच्या स्थितीत असल्याचे म्हटले आणि हा हल्ला जागे होण्याची सूचना असल्याचे म्हटले. पाकिस्तानने अफगाण तालिबान सरकारवर TTP दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा थेट आरोप केला आहे.
दक्षिण आशियात वाढत्या दहशतीचे सावट
नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील सलग स्फोटांनी दोन्ही देशांमधील तणावाचा भडका उडवला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, दहशतवाद पुन्हा एकदा राजनैतिक हत्यार बनला आहे. विश्लेषकांच्या मते, जर या घटनांच्या मागील सूत्रांची पारदर्शक चौकशी न झाल्यास दक्षिण आशियात स्थैर्य आणि विश्वास दोन्ही धोक्यात येऊ शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या
