काठमांडू (नेपाळ) : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक रविराज सिंहला नेपाळची राजधानी काठमांडू येथे अटक करण्यात आले. रविराज नेपाळमध्ये दाऊदचा सर्वात विश्वासू हस्तक मानला जातो. बनावट नोटांचं रॅकेट चालवत असल्याच्या आरोपात दाऊदच्या या हस्तकाला नेपाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

नेपाळमधून बनावट नोटांचं रॅकेट आणि बेकायदेशीररित्या कॉल बायपासचा धंदा करत असल्याचाही आरोप रविराजवर आहे. नेपाळ पोलिसांच्या सेंट्रल इन्क्वायरी ब्युरो सीआयबीने रविराजवर अटकेची कारवाई केली.



तीन वर्षांपूर्वी 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा घेऊन पाकिस्तानहून नेपाळमध्ये आलेल्या शेष मोहम्मद आणि त्याचा नेपाळी सहकारी मोहम्मद नरुल्ला यांच्या अटकेनंतर आता नेपाळी पोलिसांनी थेट या सर्व नकली नोटांच्या रॅकेटचा मास्टरमाईंड रविराज सिंह यालाच गजाआड केलं आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीही रविराजला अटक केली होती. मात्र, पुराव्यांअभावी त्याला कोर्टाने सोडून दिले. आता रविराजला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, रविराजचं थेट कनेक्शन इक्बाल मिर्ची, सुनील दुबई आणि बट्काशी होतं. हे सर्व दाऊद इब्राहिमच्या जवळचे आहेत.