Mona Lisa Painting :  पॅरिसमधील लूवर म्युझियममधील मोनालिसाच्या पेंटिंगला (Mona Lisa Painting) हवामान बदल कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. दोन महिला कार्यकर्त्यांनी संग्रहालयातील पेंटिंगसमोरील काचेवर सूप फेकले. तेथील सुरक्षेला चकवा देत दोन्ही महिला पेंटिंगच्या जवळ आल्या होत्या. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन महिला काही अंतरावरून पेंटिंगवर आधी सूप फेकतात आणि नंतर पेंटिंगच्या जवळ येतात. मात्र, पेटिंगवर बुलेटप्रूफ काच असल्याने कलाकृतीचे कोणतेही नुकसान झाले नाही. 


आंदोलकांनी उपस्थित केले प्रश्न 


पेंटिंगवर सूप फेकल्यानंतर तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पेंटिंगसमोर काळी स्क्रीन लावली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दोन कार्यकर्ते पेंटिंगजवळ आले आणि सरकार, प्रशासनाला प्रश्न विचारले."अधिक महत्त्वाचे काय आहे, कला किंवा निरोगी आणि योग्य अन्न प्रणालीचा अधिकार?" असा प्रश्न या महिला कार्यकर्त्यांनी विचारला. 


कृषी व्यवस्था खराब आहे. आमचे शेतकरी काम करताना मरत आहेत. हे दोन्ही कार्यकर्ते रिपोस्टे एलिमेंटेअर या फ्रेंच संघटनेचे प्रतिनिधीत्व करत होते. या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी एक निवेदन जारी करत, पर्यावरण आणि अन्न स्त्रोताची गरज अधोरेखित व्हावी म्हणून हा निषेध करण्यात आल्याचे म्हटले.







या आधीदेखील मोनालिसा पेटिंगवर झालाय हल्ला


याआधीही अनेकदा मोनालिसाच्या पेटिंगला लक्ष्य करण्यात  आले आहे. यापूर्वी मे 2022 मध्ये एका आंदोलनादरम्यान मोनालिसाच्या पेंटिंगसमोरील काच दाबण्यात आली होती. ऑक्टोबर 2022 मध्ये, लंडनमधील नॅशनल गॅलरीत व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या सूर्यफूल पेंटिंगवर सूप फेकण्यात आले.


बीबीसीच्या वृत्तानुसार, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि नियमांमध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी नुकतेच फ्रान्सच्या राजधानीत शेतकऱ्यांनी निदर्शने केली.