बीजिंग: चीनमध्ये कोरोनाचा विळखा (China Covid Outbreak) दिवसेंदिवस आवळतच चालला असून एकाच दिवसात 3.7 कोटी कोरोना रुग्णांची भर पडल्याचं ब्लूमबर्गच्या अहवालात (Bloomberg report) म्हटलं आहे. ही रुग्णसंख्या जगभरातीस सर्वात मोठी असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 


चीनमध्ये आतापर्यंत 24.8 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असून ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के इतकी भरते. महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांमध्येचं कोरोनाच्या एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येची भर पडली आहे. बुधवारी झालेल्या चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत बैठकीत हा डेटा शेअर करण्यात आला, असे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटलं आहे.


China Covid Outbreak: चीनमध्ये औषधांचा तुटवडा 


चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने त्या ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. चीनमध्ये आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉलची सध्या जास्त मागणी आहे. तसेच देशातील रुग्णालयंही भरली जात असल्याची माहिती आहे. 


China Corona Deaths: रोज पाच हजार रुग्णांचा मृत्यू?


कोरोनासंबंधी अभ्यास करण्याऱ्या एका ब्रिटिश संस्थेने, एअरफिनिटीने त्याच्या अहवालात म्हटलं आहे की, चीनमध्ये दररोज 10 लाख रुग्णांची भर पडत असून पाच हजार रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. परंतु वास्तविक परिस्थिती त्याहून भीषण असून हा आकडा मोठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आधी जानेवारी महिन्यामध्ये चीनमध्ये दररोज सरासरी चार लाख रुग्णांची भर पडत होती. आताच्या रुग्णसंख्येने हा आकडा पार केला  असून चीनमधील कोरोनाची स्थिती ही अधिक बिकट होत चालली असल्याचं हे लक्षण आहे. 


India Corona Updates: भारतात सतर्कतेचे उपाय


चीनसह जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने भारतातही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. देशातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तर राज्यांनी सतर्क राहावं आणि कोरोनासंबंधित व्यवस्थापनेची सर्व तयारी पूर्ण करावी, मूलभूत आरोग्य व्यवस्था बळकट करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. आज त्यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. 


ही बातमी वाचा: