Bangladesh Election Result 2026: बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
Bangladesh Election Result: निवडणुकीपूर्वी जमात-ए-इस्लामीला मोठ्या यशाची अपेक्षा होती, परंतु निकाल त्यांच्या पूर्णपणे विरोधात गेले. जमातने या निवडणूक निकालांच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहे

Bangladesh Election Result 2026: बांगलादेश निवडणुकीत अत्यंत टोकाचे आणि धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा दारुण पराभव झाला आहे. या पक्षाचा भुतकाळातील नंगानाच लक्षात ठेवत Bangladesh Nationalist Party (BNP) ला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळे पक्षाचे कार्याध्यक्ष तारिक रहमान (Tarique Rahman) पंतप्रधानपदावर बसतील हे निश्चित आहे. या निवडणुकीत अवामी लीगचा (Awami League) सहभाग नव्हता. पक्षाच्या नेत्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना देशातून पलायन केल्यानंतर भारतात राजकीय आश्रित आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले आहेत. हिंदूच्या निर्घृण पद्धतीने होत असलेल्या हत्याही चिंताजनक आहेत.
बांगलादेशात जमात-ए-इस्लामीचा पराभव का झाला?
जमात-ए-इस्लामीने (Bangladesh Jamaat-e-Islami) यावेळी विद्यार्थी पक्षासह 10 पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवली. तरीही जमातचा पराभव झाला. स्वातंत्र्ययुद्धातील त्यांच्या भूमिकेमुळे अजूनही काही मतदारांमध्ये संशय असल्याचे निकालातून स्पष्ट झालं. धार्मिक अजेंड्यावरील ठाम भूमिका शहरी आणि मध्यमवर्गीय मतदारांना फारशी भावली नसल्याचेही दिसून आलं. तुलनेत बीएनपीने व्यापक आणि मध्यममार्गी प्रतिमा तयार केली. याचा अर्थ असा नाही की धार्मिक राजकारण संपले आहे; परंतु सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ते स्वीकारले गेले नाहीत हे या निकालातून स्पष्ट होते.
जमात-ए-इस्लामीचा बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धाला विरोध
निवडणुकीपूर्वी जमात-ए-इस्लामीला मोठ्या यशाची अपेक्षा होती, परंतु निकाल त्यांच्या पूर्णपणे विरोधात गेले. जमातने या निवडणूक निकालांच्या पारदर्शकतेवर आणि प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुरुवातीला या पक्षाला आंदोलनामुळे गती मिळाली होती, परंतु प्रचाराच्या काळात हा प्रभाव ओसरला. शहरी आणि तरुण मतदारांनी जमातऐवजी BNP ला मतदान केले.
अवामी लीगवर बंदी असल्याने BNP ला मतदान
महिला मतदार आणि हिंदूंसह इतर अल्पसंख्याक समुदायांनी जमातकडे न वळता BNP ला पसंती दिली. दुसरीकडे, अवामी लीगवर बंदी असल्याने त्यांच्या समर्थकांनी जमातऐवजी BNP ला मतदान करणे पसंत केले. जमातचा अमेरिकेसोबत गुप्त करार झाल्याच्या आरोपांमुळेही त्यांचे राजकीय नुकसान झाले. जमातने 1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धाला विरोध केला होता आणि ते पाकिस्तानच्या बाजूने होते. या निवडणुकीत त्यांनी स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी लोकशाहीवादी आणि अल्पसंख्याक समर्थक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला, तसेच पहिल्यांदाच हिंदू उमेदवारही उभा केला होता. परंतु, त्यांचा धर्मांध इतिहास आणि शरिया कायद्याचे समर्थन यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल साशंकता कायम राहिली.
धार्मिक कट्टरता कमी होणार का?
दरम्यान, जमात ए इस्लामीच्या पराभवाने धर्म हा वैयक्तिक विषय असून राज्य सर्व नागरिकांचे आहे, असा संदेश मतदारांनी दिला आहे. मात्र, धर्मांध राजकारणाला काही प्रमाणात जनाधार आहे. त्यामुळे कट्टरतेत तत्काळ घट होईल असे ठामपणे म्हणता येत नाही. सरकारने कायदे, शिक्षण, आणि कायदा-सुव्यवस्था यांद्वारे संतुलन साधले तरच दीर्घकालीन परिणाम दिसू शकतील.
बीएनपी सत्तेत का आली?
गेल्या काही वर्षांत बांगलादेशात विरोधकांवरील कारवाई, निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नचिन्हे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मर्यादा यांमुळे असंतोष वाढत होता. 2024 मधील युवक-विद्यार्थी आंदोलनाने या असंतोषाला संघटित रूप दिले. त्यानंतर झालेली ही निवडणूक अनेकांच्या दृष्टीने ‘पहिली खरी स्पर्धात्मक निवडणूक’ मानली जात आहे. BNP ने या असंतोषाला दिशा देत राष्ट्रवाद, आर्थिक पुनर्बांधणी आणि संस्थात्मक सुधारणा यांचा मुद्दा पुढे केला. “स्थैर्य आणि स्वाभिमान” हा संदेश मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. परिणामी, दीर्घकाळ एकाच पक्षाच्या सत्तेविरुद्ध मतदारांनी बदलाची निवड केली.
विद्यार्थ्यांच्या पक्षाचे भविष्य काय?
बांगलादेशात शेख हसीना यांची राजवट तरुणाईने रस्त्यावर उतरत हद्दपार केली होती. आरक्षणविरोधात सुरु झालेला लढा थेट शेख हसीना यांना देश सोडण्यापर्यंत गेला. यानंतर 2024 च्या आंदोलनातून काही युवकांनी स्वतंत्र राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. रस्त्यावरचे आंदोलन आणि मतदानपेटीतील राजकारण यात फरक असतो, हे या निकालाने दाखवून दिले. तथापि, युवकांचा राजकीय सहभाग ही सकारात्मक बाब आहे. भविष्यात ते दबावगट किंवा सुधारणावादी आवाज म्हणून प्रभाव टाकू शकतात.
भारतासाठी BNP चे सत्तेवर येणं फायदेशीर की डोकेदुखी?
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारताशी संबंध अतिशय जवळचे होते. व्यापार, सुरक्षा सहकार्य, दहशतवादविरोधी समन्वय आणि पायाभूत प्रकल्पांमध्ये मोठी प्रगती झाली. आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे बांगलादेशात स्थिर सरकार आल्याने मोठा दिलासा भारताला मिळाला आहे. अतिधार्मिक सरकार सत्तेत नाही ही जमेची बाजू आहे. त्यामुळे आर्थिक सहकार्याची संधी आहे. बांगलादेश “Bangladesh First” या भूमिकेत आहे. त्यामुळे भारतासाठी संधी आणि आव्हाने दोन्ही आहेत. त्यामुळे सीमासुरक्षा सहकार्य कायम राहू शकते. आर्थिक सहकार्य वाढवण्याची सुद्धा संधी आहे. मात्र, चीन आणि पाकिस्तानशी बांगलादेशचे वाढते संबंध भारतासाठी धोरणात्मक कसोटी ठरू शकतात. सीमावाद, सीमा गोळीबार, आणि स्थलांतर यांसारखे मुद्दे पुन्हा चर्चेत येऊ शकतात.
शेख हसीनांचा मुद्दा कूटनीतीची कसोटी
दरम्यान, शेख हसीना सध्या भारतात असून त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यात त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली आहे. बीएनपी सरकार कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. कायदेशीर पुनरावलोकन, राजकीय समझोता किंवा कठोर कारवाई या सर्व पर्यायांपैकी कोणता मार्ग स्वीकारला जातो, यावर देशांतर्गत राजकारणाबरोबरच भारताशी संबंधही अवलंबून राहतील. जर हा मुद्दा पुन्हा राजकारणात बदलला, तर अस्थिरता वाढू शकते. परंतु सामंजस्याचा मार्ग स्वीकारला, तर बांगलादेशात संस्थात्मक स्थैर्य बळकट होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























