Deaths in Trailer : अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील सॅन अँटोनियोमध्ये एका ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये किमान 46 जण मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या लोकांना ट्रकमध्ये भरुन दक्षिण टेक्सासला पाठवलं जात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात ही मानवी तस्करी असल्याचं समोर येत आहे. हा ट्रक शहराच्या दक्षिणेकडील रेल्वेमार्गाजवळ सापडला. एएफपी या वृत्तसंस्थेने अमेरिकन मीडियाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.






सॅन अँटोनियो पोलिसांनी अद्याप या घटनेबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड म्हणाले की, ज्या ठिकाणी ट्रकमध्ये मृतदेह सापडले, तिथली पाहणी करण्यासाठी मेक्सिकन दूतावासातील अधिकारी त्या ठिकाणी जात आहेत.


मार्सेलो यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मृत व्यक्ती कोणत्या देशाचे आहेत, हे अद्याप समजू शकलेलं नाही. ट्विटरवर त्यांनी लिहिले की, "टेक्सासमधील अतिशय दु:खद घटना. ट्रेलरमध्ये गुदमरल्याने आतील लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मेक्सिकोच्या दूतावासातील अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. मृतांच्या नागरिकत्वाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही."






आरडाओरडा ऐकून घटनास्थळी असलेल्या एका कामगाराने याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक मृतदेह ट्रेलरबाहेर जमिनीवर पडलेला दिसला. शिवाय ट्रेलरचा गेट थोडा उघडा होता, असं पोलीस प्रमुख विल्यम मॅकमॅनस यांनी सांगितलं.


दरम्यान 16 जण जिवंत सापडले आहेत, यात चार लहान मुलांसह 12 प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना उष्णतेशी संबंधित आजारामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे, असं पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांना उष्माघात आणि थकवा जाणवत होता. "हा रेफ्रिजरेटेड ट्रॅक्टर-ट्रेलर होता, परंतु त्यात कोणताही एसी कार्यरत नव्हता."