Britain Heat Wave : ब्रिटनमध्ये सध्या उष्णतेचा तांडव पाहायला मिळत आहे. तापमानाने प्रथमच 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी दक्षिण पश्चिम लंडनमध्ये तापमान 40.2 वर पोहोचले. आता या उष्णतेचा त्रास दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये 39 अंशांवर पोहोचला. ब्रिटनमध्ये पारा आजपर्यंत कधीच चढला नव्हता. सध्याचे तापमान पाहता ते 104.4 °F पर्यंत पोहोचले, यामुळे 2019 मधील 101.6°F चा पूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. त्यामुळे हा दिवस आतापर्यंत देशातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे


लंडनमध्ये रात्रीचे तापमानही 26 अंश
परिस्थिती इतकी भीषण आहे की, येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी त्याचा त्रास आणखी वाढू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशाच्या अनेक भागांतून वेगवेगळ्या वेळी तापमानाची नोंद केली जात आहे, त्यामुळे खरा आकडा खूप मोठा असू शकतो, असे सांगण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी लंडनमध्ये रात्रीचे तापमानही 26 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. लंडनचे हवामान बहुतेक रात्री थंड किंवा आल्हाददायक असते, परंतु यावर्षी त्यात मोठा बदल झाला आहे.


अनेक भागांसाठी रेड अलर्ट 
सध्याची परिस्थिती अशी आहे की, कडक उन्हामुळे हवामान खात्याला अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. सध्या उत्तर आणि दक्षिण लंडनच्या अनेक भागात रेड अलर्ट सुरू असून, उष्णतेमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मोठी गोष्ट म्हणजे या कडक उन्हापासून वाचण्यासाठी पाच जणांनी नदीच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वजण बुडाले.


वाहतूक सुविधाही कोलमडली
ब्रिटनमध्ये या उन्हाळ्यात तांडव सुरू आहे, त्यामुळे लोक तर नाराज आहेतच, पण वाहतूक सुविधाही कोलमडली आहे. वाहतूक सचिव ग्रँट शॅप्स यांच्या मते, ब्रिटनची रेल्वे ही उष्णता सहन करण्याइतकी प्रगत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा उष्णतेला तोंड देण्यासाठी रेल्वेला स्वतःचे अधिक आधुनिकीकरण करावे लागेल आणि त्यासाठी बरीच वर्षे जावी लागतील. 40 अंश सेल्सिअस तापमानामुळे ट्रॅकचे तापमानही 50, 60 किंवा 70 पर्यंत वाढते यावर परिवहन सचिवांनी भर दिला आहे. अशा परिस्थितीत रेल्वेचे डबे रुळावरून घसरण्याचा धोका जास्त आहे.


उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडली 


रेल्वेशिवाय या उष्णतेचा परिणाम विमानतळावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. उष्णतेमुळे ल्युटन विमानतळाच्या धावपट्टीवर परिणाम झाला. त्याचप्रमाणे रॉयल एअर फोर्सलाही धावपट्टीवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. रुग्णालय आणि रुग्णसेवेवरही ताण वाढला असून, उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. अनेक शाळा बंद करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.