Texas Two Planes Collide: अमेरिकेतल्या (America) टेक्सासमधल्या (Texas) दल्लासमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. दोन विमानांची आकाशात धडक होतानाची दृश्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. बोईंग बी-17 आणि बेल पी-63 या दोन विमानांची धडक एअर शोदरम्यान जोरदार धडक झाली. दुर्घटनाग्रस्त विमानात नेमके किती प्रवासी होते, याची अद्याप अधिकृत माहिती कळू शकलेली नाही. 


अमेरिकेतील टेक्सास शहरात उंच आकाशात दोन विमानांची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. उंच आकाशात ज्या विमानांची टक्कर झाली, ती दोन्ही विमानं 'विंटेज मिलिट्री एयरक्राफ्ट' होती. जी टेक्सासमधील दल्लास शहरात एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. एअर शोमध्ये स्टंट करत असताना दोन्ही विमान हवेत आदळली. 






12 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. टेक्सासमधील दल्लासमध्ये विंटेज एअर शो सुरू होता. एक बोईंग बी-17 हवेत स्टंट करत असताना अचानक बेल पी-63 नावाचं दुसरं विमान या विमानाजवळ आलं आणि काही लक्षात येण्यापूर्वीच बोईंग बी-17 वर जाऊन आदळलं. 


दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. दोन्ही विमानात पायलटसह 6 जण असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत सर्वच्या सर्व 6 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हिडीओंमध्ये दोन विमानं हवेत एकमेंकांवर आदळताना दिसत आहेत. दोन्ही विमानं आकाशात एकमेकांवर आदळली आणि स्फोट झाला. त्यानंतर निरभ्र आकाशात काळ्या धुराचे लोळ दिसून आले. दरम्यान, FAA आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळानं अपघाताची चौकशी सुरू केली आहे.


अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन मंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. एअर शोमध्ये एवढी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रोफेशनल पायलट्सकडून एवढी मोठी चूक कशी झाली? ज्या विमानांच्या जोरावर दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव केला होता, ती विमानं एवढ्या निष्काळजीपणे कशी आदळली? या प्रश्नांचा लवकरच उलगडा होणार आहे.