America Attacks On Iran: डोनाल्ड ट्रम्पने गोडगोड बोलून पाकिस्तानचा केला वापर, इराणवर हल्ला करण्यापूर्वी काय घडलं?
Iran Israel War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे गोडगोड बोलून पाकिस्तानचा वापर केल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

Iran Israel War: इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले असतानाच अमेरिकेने (America Attacks On Iran) या युद्धात उडी घेतली होती. 21 जून रोजी अमेरिकेच्या अत्याधुनिक बी 2 स्टील्थ बॉम्बर्स विमानांनी इराणमधील तीन आण्विक तळांवर हल्ला केला होता. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने देखील इशारा दिला आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल, असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत म्हटलं आहे. यानंतर प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा, असं आव्हान अमेरिकेकडून इराणला देण्यात आले आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे गोडगोड बोलून पाकिस्तानचा वापर केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. इराणवर हल्ला करताना अमेरिकेने पाकिस्तानच्या एअरस्पेसचा वापर केल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे काही दिवसांआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आय लव्ह पाकिस्तान अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शन असिम मुनीर यांचं आदरातिथ्य करत सहभोजन केलं होतं. यानंतर काही दिवासांतच इराण आणि इस्त्रायलच्या युद्धात अमेरिकेने एन्ट्री मारली आणि पाकिस्तानच्या एअरस्पेसचा वापर करत इराणचे आण्विक तळं उद्धवस्त केल्याचं सांगण्यात येत आहे.
इराणवरील हल्ल्यावर पाकिस्तानने काय म्हटले?
अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख आण्विक तळांवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचा तीव्र निषेध करत एक अधिकृत निवेदन जारी केले. इराणच्या सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका आहे. इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानने तीव्र चिंता व्यक्त केली. या हल्ल्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे सर्व नियम आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन केले आहे. इराणला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यावरील असे हल्ले कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाहीत. हे आंतरराष्ट्रीय नियमांविरुद्ध एक धोकादायक पाऊल आहे. निवेदनात, पाकिस्तानने सर्व देशांना सामान्य नागरिकांच्या जीविताचा आणि मालमत्तेचा आदर करण्याचे आणि युद्धासारख्या कृती त्वरित थांबवण्याचे आवाहन पाकिस्तानने केले आहे.
इराण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत-
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचं प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते खामेनेई घेणार आहेत. जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे.
इस्रायल-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत तब्बल 18 टक्क्यांनी वाढली-
इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत तब्बल 18 टक्क्यांनी वाढली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत आता 75 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास पोहोचली आहे. अमेरिका मैदानात उतरल्याने कच्च्या तेलाची किंमत आता 120 डॉलर्स प्रतिडॉलर्सपर्यंत जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
























