America Attacks On Iran: इराण आणि इस्त्रायलच्या युद्धादरम्यान 21 जून रोजी अमेरिकेने इराणवर एअरस्ट्राईक (America Attacks On Iran) केला. अमेरिकेच्या अत्याधुनिक बी 2 स्टील्थ बॉम्बर्स विमानांनी इराणमधील (Iran) तीन आण्विक तळांवर हल्ला केला. याठिकाणी अमेरिकेने शक्तिशाली बॉम्ब टाकून इराणने जमिनीच्या खाली उभारलेल्या लष्करी सुविधा आणि आण्विक तळ उद्ध्वस्त केला होता. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यापूर्वी इराणने अमेरिकेला धमकी दिली होती. यामध्ये इराणमधील आण्विक तळांवर हल्ला झाल्यास आम्ही अमेरिकेत लपलेल्या स्लीपर सेल्सना सक्रिय करु, असा इशारा इराणाने अमेरिकेला दिला होता. गेल्या आठवड्यात कॅनडामध्ये झालेल्या जी-7 परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना हा इशारा देण्यात आला होता. इराणच्या या इशाऱ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले होते, असे बोललं जात आहे. तसचे यानंतर डोनाल्ड ट्रम्प 16 जून रोजी सकाळी परिषदेतून लवकर परतले आणि इस्रायल-इराण युद्ध झाल्यास त्यांच्या लष्करी पर्यायांवर विचार केल्याचं सांगितले जात आहे.
अनेक प्रमुख अमेरिकन शहरांच्या सुरक्षा संस्था हाय अलर्टवर-
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराण देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेक प्रमुख शहरांचे अमेरिकन प्रशासन आणि सुरक्षा संस्था हाय अलर्टवर आहेत. न्यू यॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लॉस एंजेलिस आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या शहरांमध्ये दहशतवादी कारवायांची भीती व्यक्त केली जात आहे. जर इराणने खरोखरच अमेरिकेत स्लीपर सेल नेटवर्क सक्रिय केले तर ते सुरक्षेसाठी एक मोठा धोका ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ओमान आणि पाकिस्तानने व्यक्त केली चिंता-
पाकिस्तान आणि ओमानसारख्या देशांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "मी इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात जीव गमावलेल्यांसाठी मी इराणी जनतेप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. हा हल्ला अत्यंत बेजबाबदार आणि चिंताजनक आहे, असं शाहबाज शरीफ म्हणाले. इस्लामिक देशांच्या शांततापूर्ण संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा ओमान देखील अमेरिकेच्या कारवाईवर खूप संतप्त दिसला. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, "हा हल्ला एक बेकायदेशीर पाऊल आहे, जो आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघड उल्लंघन आहे. ओमान नेहमीच या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि संवादाच्या बाजूने उभा राहिला आहे.
जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता-
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचं प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते खामेनेई घेणार आहेत. जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत वाढून ब्रेंट क्रूड 80 डॉलर्सवर गेलंय. युद्ध लांबल्यास ब्रेंट क्रूडचे दर 120 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतं अशी भीती आहे.