Ameria Israel Iran War live Update: दुबईचे अब्जाधीश उद्योजक खलफ अहमद अल हबतूर (Khalaf Ahmad Al Habtoor) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'X' द्वारे प्रश्नांची सरबत्ती करत हल्लाबोल केला आहे. इराणसोबतच्या वाढत्या तणावावरून हबतूर यांनी ट्रम्प यांच्या धोरणांचे वाभाडे काढले आहेत. इराणसोबत युद्ध करून आमच्या क्षेत्राला (Middle East) विनाशाकडे नेण्याचा निर्णय तुम्हाला कोणी दिला? गोळी झाडण्यापूर्वी तुम्ही होणाऱ्या भीषण परिणामांचा विचार केला आहे का? अशी विचारणा हबतूर यांनी केली आहे. खरी ताकद युद्ध पुकारण्यात नाही, तर शांतता राखण्यात असते, अशा शब्दांत हबतूर यांनी ट्रम्प यांना आरसा दाखवला आहे.
नेतान्याहूंचा दबाव होता का?
उद्योजक खलफ अहमद अल हबतूर यांनी म्हटलं आहे की, हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे की इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारच्या दबावाखाली तुम्ही हे करत आहात? इथल्या जनतेला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमच्या 'Board of Peace' या शांतता मोहिमेची शाई वाळण्यापूर्वीच तुम्ही लष्करी हल्ले सुरू केले. मग त्या शांततेच्या आश्वासनांचं काय झालं? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
आमचा पैसा आणि आम्हालाच धोका?
आखाती देशांनी शांतता आणि विकासासाठी अब्जावधी डॉलर्सचा निधी दिला. मग आम्ही हा पैसा स्वतःलाच धोक्यात टाकणाऱ्या युद्धासाठी दिला आहे का? यावर आता हिशोब हवा, अशी मागणी खलफ अहमद अल हबतूर यांनी केली आहे. तुम्ही 'आधी अमेरिका' (America First) आणि 'परकीय युद्धात अडकणार नाही' असं वचन दिलं होतं. मात्र, तुमच्या दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही सोमालिया, इराक, येमेन, नायजेरिया, सीरिया, इराण आणि व्हेनेझुएला अशा 7 देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप केला आहे. हा निर्णय फक्त आम्हालाच नाही, तर अमेरिकन जनतेलाही महागात पडत आहे. तुमच्या या युद्धखोर धोरणामुळे 4-5 आठवड्यांत 210 अब्ज डॉलर्सचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुमच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील तुमची लोकप्रियता अवघ्या 400 दिवसांत 9 टक्क्यांनी घसरली आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
