Russia-Ukraine War : रशियामध्ये पुतिन यांना राष्ट्रध्यक्ष पदावरुन हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे वृत्त युक्रेनमधील प्रसारमाध्यमांनी लष्कराच्या गुप्तचर संघटनेच्या हवाल्याने दिले आहे. द कीव इंडिपेंडेंटने दिलेल्या वृत्तानुसार, रशियातील कुलीन वर्गाने पश्चिमी देशासोबत्या आर्थिक संबंधासाठी पुतीन यांना हटवण्याच्या योजना आखल्या आहेत. एफएसबी सुरक्षा एजेन्सीचे प्रमुख अलेक्सांद्र बोर्तनिकोव यांना पुतीन यांचा उत्तराधिकारी मानले जात आहे, असा युक्रेन लष्कराच्या गुप्तचर संघटनेचा दावा आहे.
युक्रेनच्या विदेश मंत्रालयाने ट्विट करत सांगितले की, 20 मार्चपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार युद्धामध्ये आतापर्यंत रशियाचे 14 हजार 700 सैनिक मारले गेले आहेत. त्याशिवाय एक हजार 487 बख्तरबंद वाहनांना नष्ट करण्यात आले आहे. तसेच 96 विमाने, 230 तोफखान्याचे तुकडे, 118 हेलिकॉप्टर, 74 MLRS, 476 टँक, 947 वाहने, 3 जहाजे, 12 विशेष उपकरणे आणि 44 विमानविरोधी युद्ध प्रणालीही युक्रेनच्या सैन्यानी नष्ट केल्या आहेत.
...तर तिसरे महायुद्ध होणार.., झेलन्सकी यांचा इशारा
तब्बल तीन आठवड्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. हे युद्ध रोखण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले मात्र, रशियाच्या भूमिकेमुळे युद्धाला अद्याप पूर्णविराम मिळाला नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्सकी यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत वाटाघाटीला तयार आहे. पण जर हे अयशस्वी झाले तर याचा अर्थ तिसरे महायुद्ध होऊ शकते, असे झेलन्सकी म्हणाले आहेत. "पुतीन यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा, कोणत्याही संधीचा वापर करावा लागेल. परंतु जर हे प्रयत्न अयशस्वी झाले तर याचा अर्थ असा होईल की हे तिसरे महायुद्ध आहे," असंही युक्रेनियन अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
रशियन सैनिकांच्या हल्ल्यात युक्रेनमधील शाळा उद्ध्वस्त -
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष तीन आठवड्यापासून सुरु आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून रशियाकडून युक्रेमधील नागरी वस्त्यांना आणि नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, रशियाने मारियोपोल शहरातील एका शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा दावा युक्रेनने केलाय. या हल्ल्यात पूर्ण शाळा उद्ध्वस्त झाली आहे.