Washim : शेती आणि शेतीच्या रस्त्यावरुन अनेक वाद झाल्याचं आपण नेहमी बघतो. शेतीच्या रस्त्यावरून वाद विकोपाला जाऊन अनेक अनर्थ घडल्याच्या घटना देखील घडत असतात. मात्र, शेती कसण्यासाठी शेजारी आणि प्रशासन रस्ता देत नसल्याने एका शेतकऱ्याने मोठा निर्णय घेतला आहे. या शेतकऱ्याने चक्क होडी (नाव) विकत घेतली आहे. या होडीच्या सहाय्याने हा शेतकरी शेतात ये जा करत आहे. वाशिम जिल्ह्यातील ही घटना आहे. दरम्यान, शेतकऱ्याच्या या कृतीची सर्वत्र चर्चा होत असल्याच पाहायला मिळत आहे.
शेतातून जाण्यासाठी शेजाऱ्यांनी मज्जाव केल्याने शेती कसण्याचा प्रश्न निर्माण झाला होता
वाशिमच्या मौजा गावाजवळील सावरगाव जिरे शेत शिवारात काही दशका पूर्वी सिंचन तलाव प्रकल्प तयार करण्यात आला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेती सह शेतीचा रस्ता सुद्धा प्रकल्पात अधिग्रहण केला गेला. यामध्ये सुभाष सरनाईक यांचं शेत धरण काठावर असल्याने शेजारच्या शेतातून ये जा करत शेती कसावी लागत होती. मात्र, शेतातून जाण्यासाठी शेजाऱ्यांनी मज्जाव केल्याने शेती कसण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, शेती नेमकी कशी कसावी या विचारात ते होते. शेती पडीक पडण्याची भीती आणि शेजारच्या शेतकऱ्यां सोबत होणारे वादा मुळे अखेर सुभाष सरनाईक यांनी 50 हजार रुपये खर्चून होडी ( नाव) खरेदी करत शेती कसण्यास सुरुवात केली आहे.
शेतीसाठी रस्ता निर्माण करुन प्रशासन आणि सरकारने निर्णय घ्यावा
शेतीसाठी रस्ता निर्माण करुन प्रशासन आणि सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जीव धोक्यात घालून शेती किती दिवस आणि कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. दरम्यान, शेतकऱ्याच्या या मागणीव आता प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
अलिकडच्या काळात राज्याच्या विविध भागात प्रकल्पाचे कामे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक प्रकल्प येताना, त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी जाता. कधी शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळतो तर कधी कमी मोबदला मिळतो. अनेकदा प्रकल्पामुळं शेतकऱ्यांच्या जगण्याचे प्रश्न देखील निर्माण होतात. दरम्यान, अशीच घटना वाशिममध्ये घडल्याने चर्चेचा विषय बनली आहे. प्रकल्पात शेतकऱ्याची जमिनही गेली आणि शेतात ये जा करण्यासाठी असलेला रस्ताही गेला. त्यामुळं या शेतकऱ्यावर राहिलेल्या शेतात जाण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातून जावे लागत होते. मात्र, शेजारच्या शेतकऱ्याने मज्जाव केल्यानं या शेतकऱ्याने ये जा करण्यासाठी होडीच आणली आहे.
