Washim News :  वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकल्याचा संशय आहे.  त्यानंतर पतीनं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संतोष तुकाराम बकाल (वय 35) यांनी महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. मृतांमध्ये पत्नी वर्षा बकाल (वय 28), मुलगी जान्हवी बकाल (वय 7) आणि मुलगा सोहम बकाल (वय 5) यांचा समावेश आहे. 

Continues below advertisement

कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती

दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. या चौघांचा अंत नेमका कोणत्या कारणातून झाला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

नांदेड - लातूर महामार्गावरील आलगरवाडी पाटीजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

लातूर जिल्ह्यातील नांदेड - लातूर महामार्गावर आलगरवाडी पाटीजवळील नांदेड - लातूर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. आलगरवाडी पाटीजवळ नांदेडलातूर राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोरून येणाऱ्या वॅगनर कारला धडक दिली. या दुसऱ्या धडकेत कारमधील एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

Continues below advertisement

भंडाऱ्यात "हिट अँड रन"ची घटना, दोघांचा मृत्यू

भंडाऱ्यात "हिट अँड रन"ची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर अपघातास कारणीभूत असलेला अज्ञात वाहनचालक पळून गेला आहे. हा अपघात भंडारा - साकोली या राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव इथं पेट्रोलपंप समोर घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक वालदे (63) आणि भिवा बोंदले (70) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे दोघेही भंडाऱ्याच्या धारगाव येथील रहिवाशी आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूनं ते फिरायला निघाले असताना हा अपघात घडला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.