Washim: सतत सुरू असलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाच्या पाण्यातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गोंडेगाव येथे चार वर्षाचा स्वराज अशोक खिल्लारे हा चिमुकला घराबाहेर खेळताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या सिमेंट नाल्यात पडला आणि वाहून गेला. तासाभराच्या शोधानंतर जेसीबीच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आपल्या बाळाचा मृतदेह पाहताच आईने टाहो फोडला. या हृदयद्रावक घटनेने गावकरी सुन्न झाले आहेत.
नेमकं घडलं काय?
वाशिम जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे गावातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. याच पावसाच्या पाण्यातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गोंडेगाव येथे चार वर्षीय चिमुकला वाहत्या नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यूमुखी पडला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृतकाचे नाव स्वराज अशोक खिल्लारे (वय ४) असून तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील जामठी गावचा रहिवासी होता. स्वराजची आई सध्या माहेरी गोंडेगाव येथे आली होती. शनिवारी सकाळी स्वराज घराबाहेर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या सिमेंट नाल्यात त्याचा पाय घसरला. त्या वेळी नाल्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने होता.
स्वराज पडल्याचे कुणालाही कळले नाही. थोड्या वेळाने तो दिसेनासा झाल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. मात्र तो नाल्यात अडकला असल्याने त्याचा पत्ता लागू शकला नाही. जवळपास एक तासभर गावकरी, नातेवाईक आणि स्थानिकांनी शोधमोहीम हाती घेतली. अखेर जेसीबीच्या साहाय्याने नाली खोदण्यात आली तेव्हा स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. स्वराजचा मृतदेह पाहताच आईने आक्रोश केला. तिच्या टाहोने गावभर शोककळा पसरली. एका क्षणात खेळता-बोलता मुलगा गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाल्याचा प्रवाह जोरात होता आणि नाल्याच्या तोंडावर सिमेंट पाईप असल्यामुळे बालक अडकला. बालकाचा ताबडतोब पत्ता लागला नाही. तासाभराच्या जोरदार शोधानंतर, जेसीबीच्या मदतीने नाली फोडून बालकाचा मृतदेह बाहेर काढला गेला. मृतदेह बाहेर काढल्यावर आईचा आक्रोश अंगावर काटा आणणारा ठरला.