वर्धा : जिल्ह्यातील रायपूर इथं वाघाच्या (Tiger) हल्ल्यात शेतकरी भगवान धुर्वे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर धुर्वे यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला असून स्वत: खासदार कल्याण काळे हेही गेल्या 6 दिवसांपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. भगवान धुर्वे यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेलं ठिय्या आंदोलन (Wardha) आता अधिकच आक्रमक झालं. विशेष म्हणजे, गेल्या सहा दिवसांपासून भगवान धुर्वे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. कुटुंबीयांना मदत आणि इतर मागण्यांसाठी खासदार अमर काळे कुटुंबीयांसह सहा दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे, आज आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
वर्ध्यातील पीडित कुटुंबीयांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार वर्ध्यामध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे. रोहित पवार यांच्यासह खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेसचे उदय मेघे आणि ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून जिल्हा प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मागण्यांवरून चर्चा आणि वाटाघाटी सुरू होत्या. मात्र, या वाटाघाटींना अपेक्षित तोडगा न निघाल्यानं आंदोलन आता आक्रमक झालंय.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबाला नियमानुसार मदत तसेच गाव स्तरावर सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली असल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मती. सी. यांनी आज पत्रकार परिषदेत दिली होती. ग्रामस्तरावर असलेली समिती, स्थानिक नागरिक, आणि नातेवाईक तसेच सामाजिक संघटना यांच्याशी संवाद साधून गावकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविल्या आहेत. वन विभागाकडून कुटुंबातील एकाला कंत्राटी वाहनचालक अथवा वनमजूर म्हणून घेण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. सर्व गावकरी आणि नातेवाईक यांच्याशी सतत पाठपुरावा करत संवाद सुरु आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी वान्मती सी यांनी म्हटले होते. मात्र, अद्यापही आंदोलनावर तोडगा निघाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या 1989 च्या परमानंद काठरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यातील निर्णयाचा आधार घेत मानवी जीवन सन्मान आणि योग्य वागणुकीचा अधिकार हा केवळ जिवंत व्यक्ती पुरता मर्यादित नसून तो मृतकालाही लागू आहे. या सूचनाबाबत गावाकऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. अंत्यविधी लवकर करून घेण्याचे देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत दिली माहिती
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी जिल्हाधिकारी वान्मती सी यांनी माहिती दिली होती, तसेच मृतदेहावर लवकर अंत्यसंस्कार करावेत, अशी विनंती देखील त्यांनी ग्रामस्थांना केली होती. यावेळी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, बोर अभयारण्याचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी उपस्थित होते.
