परभणी: नाशिक येथे लाँग मार्च आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये ते पोलिसांना माफ करण्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत. याबाबत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?  असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi Case) यांच्या भावाने उपस्थित केलाय. तसेच लाँग मार्च काढणारे आशिष वाकोडे यांनीही सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला असून जोपर्यंत या सर्व दोषी पोलीस अधिकाऱ्यांना  सेवेतून बडतर्फ केले जात नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सोमनाथ सूर्यवंशीच्या जीवाची किंमत नाही का?- विजय वडेट्टीवार

दुसरीकडे याच मुद्यावर बोट ठेवत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी सुरेश धस दुटप्पी वागत असल्याचा आरोप केलाय.  एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सुरेश धस(Suresh Dhas) सहभागी होतात. आणि दुसरीकडे पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका, असं ते म्हणतात. भाजप आमदार पोलिसांना क्लीन चिट का देत आहेत? सोमनाथ सूर्यवंशीच्या (Somnath Suryavanshi) जीवाची किंमत नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केलाय. भाजप आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा पहा असे म्हणत एक्स या समाज माध्यमावर त्यांनी ट्विट करत एक व्हिडिओ ही शेअर केला आहे.

तर कृपया आपण हिमालयात जा आणि साधू संत व्हा- जितेंद्र आव्हाड

तर हाच व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सुरेश धस यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफ करा, असं तुम्ही कसं म्हणू शकता? असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धस यांना सवाल केला आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रकार करू नये. जर आपल्यात क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जा आणि साधू संत व्हा आणि वाल्मिक कराडला माफ करा. असा खोचक टोला ही जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धस यांना लगावला आहे. सोमनाथ सूर्यवंशीला माफ करा ही सुरेश धस यांची भावनाच वर्णवर्चस्ववादी आहे, कोणत्याही परिस्थीत अक्षय शिंदे, सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुखचा खुन्यांना माफी नाही, अशी  भूमिका ही आमदार जितेंद्र आव्हाडांनी यावेळी मांडली आहे. 

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार

हा व्हिडिओ बघा! भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा. एकीकडे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यात सुरेश धस सहभागी होतात. आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका. भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे? सोमनाथ सुर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का? एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावला आणि पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचे? हा न्याय असू शकतो का? सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही का? असेही आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. 

हे ही वाचा